Uncategorized

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ उत्साहात; ३९ महाविद्यालयांचा सहभाग

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}: विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी राज्यस्तरीय ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ ही फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धा सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे उत्साहात पार पडली. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या आळेफाटा लोकल ब्रँच आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित या स्पर्धेत राज्यातील ३९ फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कोतवाल, एसटीसीओपियन ॲल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष बाबाजी गलांडे, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा आणि बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सचिन कोठवदे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले.

यावेळी डॉ. राजेंद्रजी थिटे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत फार्मसी क्षेत्राचे महत्त्व विशद केले. सचिन कोतवाल यांनी नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनचे कार्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. बाबाजी गलांडे यांनी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज अधोरेखित केली. तर डॉ. अमोल शहा आणि डॉ. सचिन कोठवदे यांनी पेटंट प्रक्रिया, संशोधनाचे महत्त्व आणि संकल्पनांचे प्रत्यक्ष मॉडेलमध्ये रूपांतर करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्मार्ट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नियंत्रित औषधमुक्तता प्रणाली, जैवतंत्रज्ञान आणि आधुनिक औषध वितरण प्रणालींवर आधारित विविध मॉडेल्स सादर केली. या मॉडेल्समधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड दिसून आली.

डी. फार्मसी विभागासाठी डॉ. योगेश बाफना आणि मोहन शितोळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर बी. फार्मसी व एम. फार्मसी विभागासाठी प्रा. विशाल कारखिले आणि प्रा. कुणाल राऊत यांनी परीक्षण केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

बी. फार्मसी व एम. फार्मसी विभाग : प्रथम क्रमांक समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे येथील अश्विनी भोर व प्रतिभा गावडे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे येथील नयन वाघचौरे व तन्वी वाळुंज यांनी मिळवला. तृतीय क्रमांक मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, थेरगाव, पुणे येथील श्रीपाद कुलकर्णी व साक्षी पाटील यांनी पटकावला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या सारिका गारकर व समती कड यांना मिळाले.

डी. फार्मसी विभाग : प्रथम क्रमांक केबीएचएस ट्रस्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील पीयूष निकम व पंकज कापसे यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या श्रेया दरेकर व संध्या लांडगे यांनी पटकावला. तृतीय क्रमांक विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे येथील आर्या चंगेडिया व रिया भळगट यांनी मिळवला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी, वाखारी येथील गायत्री गायकवाड व प्रतिभा डोंबे यांनी पटकावले.

विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकासाठी अनुक्रमे २ हजार ५१ रुपये, १ हजार ५५१ रुपये, १ हजार ५१ रुपये आणि ५५१ रुपये रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता केसकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजयजी थिटे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, आयोजन समिती, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे व परीक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक आणि नावीन्यपूर्ण विचारांना चालना देणारी ही स्पर्धा फार्मसी क्षेत्रातील भावी संशोधक घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button