शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील सुंदरसृष्टी व केवल कुंज परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या घटनेची गांभीर्याने दखल घेत नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी तातडीने पुढाकार घेत वनविभागाला पाचारण केले. बिबट्याला पकडण्यासाठी संबंधित परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरसेवक थेऊरकर यांनी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक उमेश शेळके आणि रिंकू जगताप यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
दरम्यान, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) निळकंठ गव्हाणे, वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक गणेश झिरपे आणि वनमजूर दिनेश गोरड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याचा संभाव्य वावर लक्षात घेऊन त्याला पकडण्यासाठी संबंधित ठिकाणी पिंजरा लावण्याची कार्यवाही करण्यात आली.
शहरालगतच्या नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात नियमित गस्त घालावी तसेच नागरिकांनीही रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.