दिवाळीत घरापासून दूर असलेल्या एस.टी.च्या चालक-वाहकांसाठी माणुसकीचा फराळ; संजय कडेकर यांचा २१ वर्षांचा सेवाभावी उपक्रम!
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: दिवाळी म्हटली की प्रत्येकाला आपल्या घराची, कुटुंबाची आणि स्नेहाच्या माणसांसोबत सण साजरा करण्याची ओढ लागते. मात्र, आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करू शकतो, यासाठी काही माणसे स्वतःच्या सण-आनंदाला बाजूला ठेवून अहोरात्र प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असतात.
अशाच एस.टी.च्या चालक आणि वाहकांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याचे माणुसकीचे काम शिरूर बस आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी संजय कडेकर हे गेल्या तब्बल २१ वर्षांपासून निष्ठेने करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमातून यंदाही ३५० हून अधिक चालक-वाहकांची दिवाळी आनंददायी झाली.
दिवाळीच्या सणानिमित्त शिरूर बस आगारात मुक्कामासाठी थांबणाऱ्या तसेच कर्तव्यावर असणाऱ्या चालक आणि वाहकांसाठी कडेकर यांनी अभ्यंगस्नानाची विशेष व्यवस्था केली होती. यामध्ये आंघोळीसाठी गरम पाणी, उटणे, साबण आणि सुवासिक तेल उपलब्ध करून देण्यात आले. अभ्यंगस्नानानंतर चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली असा दिवाळीचा पारंपरिक फराळ आणि चहाचीही व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम केवळ औपचारिकता न ठेवता प्रत्येक कर्मचाऱ्याला आपुलकीची वागणूक देत राबविण्यात आला.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर हे महत्त्वाचे मध्यवर्ती बसस्थानक आहे. येथून दररोज मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने शेकडो एस.टी. बसेस धावतात. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे चालक आणि वाहक शिरूर आगारातील विश्रामगृहात मुक्कामासाठी थांबतात. दिवाळीच्या काळातही प्रवाशांची वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रत्येकाला आपल्या घरापर्यंत पोहोचता यावे, यासाठी हे कर्मचारी सणासुदीच्या दिवशीही कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या याच सेवाभावाची जाणीव ठेवून संजय कडेकर यांनी स्वतः पुढाकार घेत या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा आनंद आगारातच उपलब्ध करून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगारातील कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे चालक आणि वाहक भारावून गेले. आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आमची काळजी घेतली जात असल्याने दिवाळीच्या दिवशी घरापासून दूर असल्याची खंत कमी झाली आणि मनाला मोठा आनंद मिळाला, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमामागील भावना सांगताना संजय कडेकर म्हणाले, “माझे वडील निवृत्ती कडेकर हे एस.टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे प्रत्येक दिवाळीला ते कर्तव्यामुळे घराबाहेर असायचे. दिवाळीच्या दिवशी कामावर असणाऱ्या चालक आणि वाहकांसाठी काहीतरी करावे, अशी त्यांची इच्छा होती. वडिलांची ही भावना जपण्यासाठी मी मागील २१ वर्षांपासून शिरूर बस आगारातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवीत आहे.”
दरम्यान, या उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिक व पसायदान ग्रुपचे सदस्य डॉ. भास्कर पोटघन यांनी विशेष कौतुक केले. कडेकर हे एस.टी. महामंडळाच्या शिरूर आगारात रोखपाल म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतरही आपल्या कर्मभूमीशी आणि सहकाऱ्यांशी असलेले नाते त्यांनी कृतीतून जपले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून, स्वतः वेळ देऊन आणि स्वखर्चाने माजी सहकारी तसेच सध्या सेवेत असलेल्या चालक-वाहकांची गैरसोय होऊ नये,
यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. अशी निःशब्दपणे माणुसकी जपणारी माणसेच समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतात, अशा शब्दांत डॉ. पोटघन यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या कृतज्ञतापूर्ण उपक्रमाच्या वेळी शिरूर आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड उपस्थित होत्या.स्वतःच्या वडिलांची आठवण जपत २१ वर्षे दुसऱ्यांच्या घरातील आनंदासाठी धडपडणारे संजय कडेकर यांचे कार्य हे केवळ दिवाळी फराळाचे आयोजन नाही, तर कर्तव्य बजावताना घरापासून दूर असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मनात आपलेपणाचा दिवा पेटविणारी माणुसकीची ज्योत आहे!
यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. अशी निःशब्दपणे माणुसकी जपणारी माणसेच समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतात, अशा शब्दांत डॉ. पोटघन यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.