Uncategorized

जमाना बदलतो आहे असे म्हणून नावे ठेवण्यापेक्षा बदलत्या जमान्याशी समरस व्हा : लेखक व वक्ते चकोर गांधी

 

 

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात झपाट्याने बदल घडत असून त्याचा थेट परिणाम कुटुंबव्यवस्था, नाती, व्यवसाय आणि जीवनशैलीवर होताना दिसत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते लेखक सनदी लेखापाल चकोर गांधी यांनी व्यक्त केले.

येथील सनशाईन क्लब च्या वतीने गांधी यांचे ‘क्या जमाना बदल रहा है ‘या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, व्यवसायिक महेश कटारिया, उद्योग निरिक्षक चेतन बर्गे, पालघरचे उत्पादन शुल्क निरीक्षक अभिजित मानकर, व्यावसायिक महेश कटारिया आदी उपस्थित होते.

गांधी म्हणाले लग्नाचे वय वाढत असून , एकच मूल किंवा मूलच नको असा ट्रेंड वाढत आहे.भविष्यात काका-मावशी आत्या यासारखी नाती दुर्मीळ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.सध्या समाजात ‘झेन अल्फा’ ही नवी पिढी पुढे येत आहे. विशेष म्हणजे आता पिढीचे स्वरूप तीन-चार वर्षांतच बदलत असल्याचे चित्र आहे. यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील विचारांमध्ये मोठी दरी निर्माण होत आहे. संयम कमी होणे, “मी आणि माझं” ही मानसिकता वाढणे, तसेच वैयक्तिक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिले जाणे हे या बदलांचे ठळक पैलू आहेत.

व्यवसाय, नोकरी आणि सामाजिक व्यवहारात सातत्याने बदल होत आहेत. लोक बदलतात, भवताल बदलते आहे त्यामुळे प्रत्येकालाच काळानुसार स्वतःत बदल करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले . “जमाना बदलतो म्हणून नाव ठेवण्याऐवजी, बदलाशी समरस व्हा ,” असे ही गांधी म्हणाले.

नवीन पिढीकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. ही पिढी तंत्रज्ञानात अत्यंत स्मार्ट असून ऑन-स्क्रीन रीडिंग, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर आणि निर्णयक्षमतेत पुढे आहे. केवळ मोबाइलवर रमलेली पिढी अशी टीका करण्याऐवजी, ती किती जबाबदार आहे हे समजून घेण्याची गरज असल्याचे मत गांधी यांनी व्यक्त केले.

भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मानवी जीवनाचे विश्वच बदलणार असून शिक्षण, व्यवसाय, आरोग्य आणि दैनंदिन व्यवहारात मोठे परिवर्तन घडवणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञानाशी मैत्री करणे काळाची गरज बनली आहे.वयोमान वाढत असताना आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले . तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी वाचनाची आवड जोपासणे, गायन, वादन यांसारखे छंद विकसित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

एकूणच बदलत्या काळाशी जुळवून घेत, नव्या पिढीकडून शिकत, परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. स्वागत महेश कटारिया यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या उद्योग निरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवलेले चेतन दत्तात्रय बर्गे यांचा यावेळी विशेष सन्मान किशोर राजे निंबाळकर व चकोर गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button