महाराष्ट्र

व्यापाऱ्यांच्या व पोलिसांचा संवाद वाढविणार; शहरातील पार्किंग, वाहतूक व सुरक्षा प्रश्नांवर व्यापारी मेळाव्यात चर्चा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}देशाच्या आर्थिक प्रगतीत व्यापारी वर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून बदलत्या काळात सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले.

अखिल एकता उद्योग व्यापार मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त शिरूर येथील सरदार पेठेतील ओम लाईट हाऊस येथे आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पारनेरचे नायब तहसीलदार आकाश किसवे, कापड असोसिएशनचे निलेश पिपाडा, मामा धोंडगे, नगरसेवक राजेंद्र लोळगे, नगरसेवक उमेश शेळके, भाजपच्या रेश्मा शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. संपत लोखंडे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, विजय नरके, निलेश भळगट, महावीर कर्नावट, प्रा. रासकर आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक विनोद पाटील म्हणाले की, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.व्यापाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक दुकानात तसेच परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. व्यापारी आणि पोलिसांमध्ये परस्पर विश्वास व सहकार्याची भावना अधिक दृढ होणे आवश्यक असून, व्यापाऱ्यांशी नियमित संवाद साधण्यासाठी पुढील काळात बैठका आयोजित करण्यात येतील.

नायब तहसीलदार आकाश किसवे यांनी व्यापाऱ्यांनी संघटितपणे आपल्या समस्या मांडण्याची गरज व्यक्त केली. अखिल एकता उद्योग व्यापार मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जात असल्याचे सांगत त्यांनी बँकिंग व आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत मार्गदर्शन केले.

मेळाव्यात व्यापारी वर्गासमोरील विविध समस्या, व्यापाऱ्यांशी संबंधित कायदे, व्यवसायातील अडचणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.

प्रास्ताविक प्रवीण भंडारी यांनी केले. व्यवसायिक प्रा. संपत लोखंडे यांनी शहरातील पार्किंगची समस्या मांडली. नगरसेवक राजेंद्र लोळगे यांनी व्यापाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह सराफ कट्टा परिसरात गस्ती पथक कार्यान्वित करण्याची मागणी केली.

बांधकाम मटेरिअल व्यावसायिक अतुल बोथरा, प्रकाश चोपडा, निलेश पिपाडा आणि राजेश शिंगवी यांनीही व्यापारी वर्गाच्या विविध अडचणी मांडल्या. नगरसेवक उमेश शेळके यांनी मोकाट जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच वाहतूक आणि पार्किंग प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलिसांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली. व्यावसायिक बगाडे यांनी पार्किंगचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

कार्यक्रमाचे आभार नितीन भंडारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button