घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठया संख्येने सभासद यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, सुधीर फराटे व काकासाहेब खळदकर यांचे आवाहन
शिरूर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ७८-अ अंतर्गत कारखान्यावर प्रशासक का नेमू नये, याबाबत शासनाकडून दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) कारखान्याचा कर्जप्रस्ताव नाकारल्याने कारखान्याची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेने होत असल्याचा आरोप माजी संचालक सुधीर फराटे व सहकार नेते काकासाहेब खळदकर यांनी केला.
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत माजी संचालकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभासदांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
काकासाहेब खळदकर म्हणाले, “घोडगंगा कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व आमदार माऊली कटके यांच्या उपस्थितीत राज्यस्तरावर अधिकाऱ्यांची बैठक झाली.
मात्र, अपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रांमुळे शासनाला अपेक्षित अहवाल सादर झालेला नाही. संचालक मंडळास कलम ७८-अ अंतर्गत दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे. NCDC नेही कर्जप्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य
धोक्यात आले असून सभासदांनी एकजुटीने खाजगीकरणाचा प्रयत्न हाणून पाडावा.”
सुधीर फराटे म्हणाले, “कारखान्याचा ताळेबंद कमकुवत असणे, भागभांडवल कमी असणे तसेच डीपीआरबाबत संचालक मंडळाकडून अपेक्षित ठोस आश्वासन नसल्याने NCDC ने कर्जप्रस्ताव नाकारला आहे. कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वप्रथम भक्कम भागभांडवल उभारणे आवश्यक आहे.
माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे म्हणाले, “मागील तीन हंगामांपासून घोडगंगा कारखाना बंद आहे. कारखाना सुरू करण्यासाठी राजकारण न करता, एकमेकांना दोष न देता सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार माऊली कटके यांची बदनामी करून कारखाना सुरू होणार नाही. कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी.”
दरम्यान, शनिवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याची आर्थिक स्थिती, NCDC कर्जप्रस्ताव, भागभांडवल उभारणी, कलम ७८-अ अंतर्गत प्रशासकीय कारवाई तसेच कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या पर्यायांवर सभासदांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार परिषदेस दादापाटील फराटे, सुधीर फराटे, माजी सभापती शिरूर पंचायत समिती दादासाहेब कोळपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, मार्केट कमिटी संचालक राहुल गवारे, सहकार नेते काकासाहेब खळदकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वीरेंद्र शेलार, शिरूर पंचायत समिती सदस्य दीपक कोहकडे, माजी पंचायत समिती सदस्य
राजेंद्र गदादे, सुभाष कोळपे, सोसायटी चेअरमन शरद साठे, सोसायटी संचालक कुंडलिक शितोळे, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ कदम, PMRDA संचालक प्रकाश गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ऋषी खोरे, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वैभव कोळपे, अशोक गारगोटे, हनुमंत शेलार, मयूर शेळके, कालूभाई शेख, शैलेश जाधव व रघुनंदन गावर आदी उपस्थित होते.