महाराष्ट्र

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस अलर्ट मोडवर; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम

सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त; पाबळ फाटा चौकात नाकाबंदी, ६९ वाहनचालकांवर कारवाई

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24} दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील वाढती गर्दी, सराफ व्यावसायिकांकडील सोने-चांदीच्या दागिन्यांची व रोख रकमेची उलाढाल आणि अलीकडील गुन्हेगारी घटनांचा विचार करून शिरूर पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना तीव्र केल्या आहेत. सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त, तर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील पाबळ फाटा चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनचालकांवर कारवाई करून ९८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दिवाळीच्या काळात खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होते. सराफ दुकानांमध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी-विक्री आणि रोख व्यवहार वाढतात. गर्दीचा फायदा घेऊन चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी यांसारखे गुन्हे घडण्याची शक्यता असते. तसेच व्यापारी प्रतिष्ठाने बंद झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर संभाव्य गुन्हे रोखणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा पोलिसांच्या पायी गस्तीमागील  उद्देश आहे.

सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) शिरूर पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने सराफ कट्टा, मुख्य बाजारपेठ आणि व्यापारी प्रतिष्ठानांच्या परिसरात पायी गस्त घातली. या वेळी गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून पोलिसांनी बाजारपेठेत प्रत्यक्ष उपस्थिती ठेवली. पोलिसांच्या नियमित हालचालींमुळे संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध घालण्यास आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.
वाहतूक शिस्त राखणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत पाबळ फाटा चौकात विशेष नाकाबंदी करण्यात आली. या वेळी चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनचालकांवर कारवाई करून ९८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

पोलिसांच्या कारवाईबरोबरच नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही सुरक्षिततेबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. सराफ व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा यंत्रणा कार्यरत ठेवाव्यात, दुकान बंद करताना दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी. मोठी रक्कम घेऊन जाताना विशेष काळजी घ्यावी. बाजारपेठेत संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

शिरूर परिसरात अलीकडील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता वाढवली असून, दिवाळीच्या काळात बाजारपेठा, प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त व वाहन तपासणीवर भर दिला जात आहे. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, संभाव्य गुन्हे रोखणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात दिवाळी साजरी करता यावी, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button