Uncategorized

शिरूर तालुक्यात ७४ हजार शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; ८४ कोटींच्या भरपाईची प्रतीक्षा

१०९ गावांतील ५५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित; डिसेंबरअखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध

  • शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: अपुऱ्या पावसामुळे शिरूर तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तालुक्यातील १०९ गावांमधील ७४ हजार ४२ शेतकऱ्यांच्या ५५ हजार १३९ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनाकडून ८४ कोटी ३८ लाख ३९ हजार २७० रुपयांचा निधी अपेक्षित असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी दिली.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, पंचायत समिती आणि कृषी विभागाने संयुक्तपणे हे पंचनामे पूर्ण केले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पेरण्यांवर परिणाम झाला असून, ऊस, बाजरी, मूग, कांदा यांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३१ हजार ५१२ हेक्टर क्षेत्रावरील ऊस, ५ हजार ४४७ हेक्टरवरील बाजरी आणि १ हजार ६३८ हेक्टरवरील मूग पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता शासनाच्या नुकसानभरपाईकडे लागले आहे.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे. शिरूर तालुक्यात एकूण १ लाख ८३ हजार १३९ पशुधन असून, त्यामध्ये ८३ हजार ४३७ गायी, १८ हजार ७९१ म्हशी, ३५ हजार ३२१ शेळ्या आणि ३१ हजार ६६१ मेंढ्यांचा समावेश आहे. या पशुधनासाठी सुमारे २ हजार ९१३ मेट्रिक टन चा- याची आवश्यकता आहे. काही महसूल मंडळामध्ये डिसेंबर नंतर चारा टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ज्या पशुपालकाकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे अशा पशुपालक शेतकरी यांना अतिरिक्त मका बियाणे 100% अनुदानावर पुरविण्यात येणार आहे यामधून काही प्रमाणात अतिरिक्त चारा उपलब्ध होणारा आहे.

हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केल्यास उसाचे वाढे उपलब्ध होणार नसल्याने मा. साखर आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार ऊस तोडणी प्राधान्याने मजुरामार्फत करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना चारा बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत चार टन चारा बियाण्याचे वाटप पूर्ण आहे. तालुक्यातील उर्वरित भागात लवकरच बियाणे प्राप्त होणार असून त्याचे वितरण पशुपालक/ शेतकऱ्यांना केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button