राष्ट्रीयविशेष

संघर्षातून जगण्याची जिद्द; अनाथ मुलांकडून विद्यार्थ्यांनी शिकला कृतज्ञतेचा धडा!

आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमाला भेट देत सामाजिक संवेदनशीलतेचा प्रेरणादायी धडा गिरवला.

  1. शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}

    संघर्षातून जगण्याची जिद्द; अनाथ मुलांकडून विद्यार्थ्यांनी शिकला कृतज्ञतेचा धडा!

    शिरूर : आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सहज मिळत असताना तिचे मोल कळत नाही; मात्र प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत शिक्षणाची वाट चालणाऱ्या मुलांचे आयुष्य जवळून पाहिल्यानंतर जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. याच जाणीवेची पेरणी करण्यासाठी शिरूरच्या आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमाला भेट देत सामाजिक संवेदनशीलतेचा प्रेरणादायी धडा गिरवला.

शिक्षणातून केवळ गुण मिळवण्यापेक्षा जीवनातील संघर्ष समजून घेणे, उपलब्ध सुविधांचे महत्त्व जाणणे आणि समाजाप्रती कृतज्ञतेची भावना जोपासणे, हा या क्षेत्रभेटीमागील मुख्य उद्देश होता. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान आश्रमातील मुलांसाठी साखर, तेल, तांदूळ, रवा, पोहे आदी किराणा साहित्य तसेच कपडे भेट दिले.

यावेळी शाळेच्या प्राचार्या अश्विनी घारू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही; आपण सगळे एकच आहोत. मात्र, मायेची पाखर देणारे पालक, लाड पुरवणारे कुटुंबीय आणि हक्काची माणसे जवळ नसतानाही ही मुले ध्येयासाठी संघर्ष करत शिक्षण घेत आहेत. त्यांची जिद्द आपल्या सर्वांसाठी शिकण्यासारखी आहे,”असे सांगितले.

आपल्याला गरजेच्या वेळी मदत करणारे पालक, आपले हट्ट पुरवणारे कुटुंबीय आणि प्रेम देणारी माणसे लाभली आहेत, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी. आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहावे आणि भविष्यात सक्षम झाल्यानंतर आपल्यासारख्या गरजू मुलांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी आश्रमातील मुलांजवळ बसून त्यांची विचारपूस केली, त्यांच्याशी गप्पा मारल्या तसेच त्यांच्या राहण्याच्या आणि जेवणाच्या व्यवस्था जाणून घेतल्या. या मुलांचा संघर्ष आणि शिक्षणासाठीची धडपड जवळून अनुभवल्यानंतर आपल्याला मिळालेल्या सुविधा, पालकांचे प्रेम आणि कुटुंबाचा आधार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना उमगले. सहवेदना, सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची भावना रुजविण्याच्या दृष्टीने ही भेट अर्थपूर्ण ठरली.

या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, सचिव नंदकुमार निकम, शालेय समितीचे अध्यक्ष शिरीष बरमेचा, सदस्य चंदुलाल चोरडिया आणि राजेंद्र भटेवरा यांनी विद्यार्थी, वर्गशिक्षक, पर्यवेक्षक आणि प्राचार्या यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button