शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}खान्देशकरांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई माता उत्सवाचे शिरूरमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. कानबाई माता उत्सव समिती, शिरूर यांच्या वतीने २९ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत रामलिंग मंदिरासमोरील सभामंडपात हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
उत्सवाची सुरुवात शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सप्त पूजनाने झाली रविवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता रोटेपुजन, पूजाविधी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ५ वाजल्यापासून कानबाई मातेच्या आगमनाची तयारी करण्यात येणार आहे.
सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता कानबाई माता मिरवणूक व विसर्जन सोहळा पार पडणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष आकर्षण म्हणून दोस्ती बँड, शेगाव (जि. नाशिक) यांचे वादन राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
कानबाई माता उत्सवाच्या माध्यमातून शिरूर परिसरातील खान्देशी समाज बांधवांना एकत्र आणत श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्सवातील धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कानबाई माता उत्सव समिती, शिरूर तसेच समस्त खान्देशी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.