शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील चांगल्या कार्याला प्रसिद्धी देतात, तर वाईट प्रवृत्तींवर अंकुश ठेवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शिरूर तालुका यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारा १४ मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी धारीवाल बोलत होते.
पत्रकार संघाच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. पत्रकारिता केवळ बातम्यांपुरती मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे धारीवाल यांनी नमूद केले.
सिनेअभिनेते सुनील गोडबोले म्हणाले, “पत्रकार संघाचे सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहेत. आजवर अनेक पुरस्कार मिळाले; मात्र पत्रकार संघाकडून मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असल्याने त्याचा विशेष आनंद आहे. प्रत्येकाने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करून आयुष्यात यशस्वी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कारप्राप्त मान्यवर : सुनील गोडबोले (सिनेरत्न), गंगाराम जाधव (मानवसेवारत्न), प्रकाश भाऊ धारीवाल मित्र मंडळ व ‘महावीर की रोटी’ (समाजरत्न), दीपक करगळ व धरमचंद फुलफगर (उद्योगरत्न), निलेश गायखे (ज्योतिष व वास्तुविशारद रत्न), प्रिया बिरादार (समाजरत्न), अशोक मानमोडे (कोरोना योद्धा), रामदास राऊत (उत्कृष्ट दिग्दर्शक), बापुसाहेब जाधव, अरुण मोटे व भगवान श्रीमंदिलकर ( पत्रकार) आणि निलेश पाठक (सर्पमित्र).
कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, स्वप्नील ढमढेरे, विठ्ठल घावटे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष अर्जुन बढे, शहराध्यक्ष बबन वाघमारे, माजी अध्यक्ष रविंद्र ढोबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष शिंदे, अर्जुन बढे, बबन वाघमारे, ॲड. अश्विनी सांगळे, रुपाली खिलारी, योगेश भाकरे, सुनील पिंगळे व आकाश भोरडे यांनी परिश्रम घेतले. स्वागत संतोष शिंदे यांनी केले, प्रास्ताविक अर्जुन बढे यांनी केले, तर आभार बबन वाघमारे यांनी मानले.