Uncategorized
दुष्काळसदृश परिस्थितीत नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नका!
संभाजी कर्डिले यांची मागणी; वीज वितरण कंपनीने संवेदनशील भूमिका घेण्याचे आवाहन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई तात्पुरती थांबवावी, अशी मागणी तर्डोबाचीवाडीचे माजी उपसरपंच व मराठा महासंघाचे शिरूर चे माजी अध्यक्ष संभाजी बाजीराव कर्डिले यांनी केली आहे.
टाकळी हाजी, आमदाबाद, आण्णापूर, शिरूर ग्रामीण, तर्डोबाचीवाडी, गोलेगाव, निमोणे, गुनाट, शिंदोडी आणि चिंचणी परिसरातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीज वितरण कंपनीने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे आवाहन कर्डिले यांनी केले आहे.
पावसाचे अनिश्चित प्रमाण, वाढता उत्पादन खर्च, पिकांना पाण्याची गरज आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन तोडल्यास पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नदीतील उपलब्ध पाण्यावर आणि विद्युत पंपांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे.
एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे थकीत वीजबिलांमुळे कनेक्शन तोडण्याची कारवाई, यामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिक गंभीर होऊ शकते.
त्यामुळे वीज वितरण कंपनीने ही कारवाई तात्पुरती स्थगित करून शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी पुरेसा अवधी द्यावा, तसेच थकीत बिलांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी कर्डिले यांनी केली.
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. शासनाने संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असेही कर्डिले यांनी म्हटले आहे.




