Uncategorizedमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष

भास्कर खोसे यांची सारस्वत बँकेच्या संचालकपदी निवड

शिरूर : देशातील अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक असलेल्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी अनुभवी बँकर भास्कर लक्ष्मण खोसे यांची निवड झाली आहे. तब्बल ४९ वर्षांचा प्रदीर्घ बँकिंग अनुभव, प्रशासकीय कौशल्य, कायदेविषयक सखोल ज्ञान आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वयाच्या १८व्या वर्षी सारस्वत बँकेत सेवेत दाखल झालेल्या खोसे यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळत मुख्य महाव्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली. नोकरीतील जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी शिक्षणाची कास कायम ठेवत बी.कॉम., एलएल.बी. आणि सीएआयआयबी या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता संपादन केल्या.

बँकेच्या कायदा व प्रशासन विभागाचे नेतृत्व करताना त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची छाप पडली. बँकिंग क्षेत्रातील कायदेविषयक आणि नियामक बाबींचा त्यांचा अनुभव विशेष उल्लेखनीय आहे. इंडियन बँक्स असोसिएशनच्या (IBA) कायदेविषयक समितीवर त्यांनी दशकाहून अधिक काळ सारस्वत बँकेचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे बँकिंगविषयक कायदे, नियामक चौकट आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेचा त्यांना प्रदीर्घ अनुभव मिळाला.

सारस्वत बँकेतील जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत संस्थेचे हित सर्वोच्च मानून काम करणाऱ्या खोसे यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांचा प्रशासकीय अनुभव, कायदेविषयक ज्ञान आणि बँकिंग क्षेत्रातील बदलांचा जवळून घेतलेला वेध यांचा संचालक म्हणून बँकेच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत निश्चितच उपयोग होणार आहे.

पारनेर तालुक्यातील गुणोरे गावाशी नाळ असलेल्या भास्कर खोसे यांचे बालपण व शालेय शिक्षण मुंबईतील डोंगरी परिसरात झाले. व्यावसायिक क्षेत्रात मोठी वाटचाल करूनही त्यांनी आपल्या जन्मभूमीशी असलेले नाते कायम जपले आहे. गुणोरे गावासह पारनेर तालुक्याशी त्यांचा आजही जिव्हाळ्याचा संपर्क आहे.

सामान्य कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, वयाच्या १८व्या वर्षी स्वीकारलेली बँकेतील नोकरी, नोकरीसोबत पूर्ण केलेले उच्च शिक्षण, विविध जबाबदाऱ्यांमध्ये केलेले उल्लेखनीय कार्य आणि ४९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मिळालेली संचालकपदाची संधी हा भास्कर खोसे यांच्या यशस्वी कारकिर्दीचा प्रेरणादायी प्रवास मानला जात आहे.

त्यांच्या निवडीबद्दल गुणोरे ग्रामस्थ, पारनेर तालुक्यातील नागरिक तसेच बँकिंग व सहकार क्षेत्रातील सहकारी आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button