Uncategorized

बांबूपासून साकारल्या ‘प्रेमाच्या राख्या’; शिरूरमध्ये विशेष मुलांचा अनोखा रक्षाबंधन उपक्रम

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता प्रेम, आत्मनिर्भरता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत शिरूरमध्ये विविध उपक्रमांनी रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या विशेष मुलांनी स्वतःच्या हातांनी बांबूपासून आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमातून त्यांच्या सर्जनशीलतेला आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळाले.

बांबू प्रकल्पाच्या माध्यमातून निरुपमाताईंनी विशेष मुलांना राख्या तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून दिला. या साहित्यापासून मुलांनी उत्साहाने व कल्पकतेने सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हातांनी निर्मिती केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. “विशेष मुलांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि विश्वास दिल्यास त्यांच्या हातूनही सुंदर व प्रेरणादायी निर्मिती घडू शकते,” असे राणीताई चौरे यांनी सांगितले.

दरम्यान, शिरूर येथील कर्मलोदया संस्थेतील विशेष मुलींच्या शाळेत भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून रक्षाबंधनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही विशेष मुलींच्या हातून ‘संस्कारांची राखी’ बांधून घेत हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील उपेक्षित घटकांना आपलेसे करणे आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या स्वप्नाला बळ देणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले.

या सोहळ्याचे नियोजन डॉ. परवेज बागवान, योगेश जामदार, बंडू दुधाणे आणि विकास साबळे यांनी केले. सुशांत कुटे यांनी प्रास्ताविक केले. योगेश जामदार यांनी सूत्रसंचालन केले, तर संस्थेच्या व्यवस्थापिका सिस्टर सौम्या यांनी आभार मानले.

यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, भाजपचे गटनेते नितीन पाचर्णे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, सुनील जाधव, उमेश शेळके, सागर नरवडे, माजी नगरसेवक आबिद शेख, मंगेश खांडरे, डॉ. संतोष पोटे, तुकाराम खोले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, रिपब्लिक पार्टीचे अध्यक्ष नीलेश जाधव, संतोष शितोळे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विशाल जोगदंड यांच्यासह प्रवीण गायकवाड, सुदर्शन दरेकर, आशिष भोजने, अविनाश घोगरे, हर्षद ओस्तवाल, संपत दसगुडे, वसीम सय्यद, संजय काळे, अविनाश जाधव, मुश्ताक शेख, स्वप्नील रेड्डी, महेंद्र येवले, गफूर शेख, आसिफ शेख आदी उपस्थित होते.

ब्रह्माकुमारी केंद्रावरही रक्षाबंधन

दरम्यान, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिरूर केंद्रावरही रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अर्चना बहनजी आणि शकुंतला बहनजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनघा पाठकजी, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, राजेंद्र टाकसाळे, अतुल पाठकजी, गणेश कोळपकर, विलास आंबेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी जीवनातील वाईट दुर्गुणांचा त्याग करण्याचा संकल्प केला.

विशेष मुलांच्या हातून साकारलेल्या राख्या आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेला मिळालेले प्रोत्साहन यामुळे यंदाचे शिरूरमधील रक्षाबंधन सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारे ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button