Uncategorized

आर्थिक साक्षरता ही काळाची गरज; योग्य संपत्तीत गुंतवणूक करा : डॉ. हेमंत भागवत

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: भारतात आर्थिक साक्षरता हा अद्याप दुर्लक्षित विषय असून, नागरिकांनी भविष्यासाठी सजग होत आर्थिक नियोजन करावे आणि विविध योग्य संपत्ती प्रकारांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन गुंतवणूक तज्ज्ञ व लेखक डॉ. हेमंत भागवत यांनी केले.

शिरूर नगरपरिषद आणि शिरूर रिक्रिएशन क्लब अँड लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तद्वार वाचनालय’ अंतर्गत ‘आर्थिक जागरूकता व साक्षरता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. दिपक गायकवाड होते.

डॉ. भागवत म्हणाले, बचत आणि गुंतवणूक यात फरक आहे. बचतीत पैशांची वाढ मर्यादित असते, तर योग्य नियोजनातून गुंतवणुकीद्वारे संपत्ती वाढविण्याची संधी मिळते. सोने, शेअर्स, कर्जरोखे आणि मालमत्ता यांसारख्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, संपूर्ण पैसा एकाच संपत्ती प्रकारात गुंतवू नये. गुंतवणुकीत विविधता असणे आवश्यक आहे.

आर्थिक स्वातंत्र्यासाठी जीवन विमा आणि आरोग्य विमा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपत्कालीन निधी तयार ठेवणे गरजेचे असून, कुटुंबाच्या उत्पन्नातील सुमारे २० टक्के रक्कम दरमहा गुंतवणुकीसाठी राखून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

महागाई सातत्याने वाढत असल्याने भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या पिढीने केवळ वर्तमानातील खर्चाचा विचार न करता भविष्यासाठी आर्थिक शिस्त निर्माण करावी. नियमितपणे म्युच्युअल फंडासह योग्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करून ‘आपल्या पैशाला कामाला लावा’, असे आवाहन भागवत यांनी केले.

वाढते आयुर्मान लक्षात घेता भविष्यात आरोग्य विम्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे. त्यामुळे स्वतःबरोबरच कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे. ही साक्षरता केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता पुढील पिढीलाही आर्थिक नियोजनाची सवय लावावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र धनक यांनी केले. आर्थिक नियोजन, गुंतवणूक, बचत तसेच आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळावी, या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रा. दिपक गायकवाड म्हणाले की सध्याचा काळ हा धोकादायक आहे. अश्या परिस्थितीत नियोजन महत्वाचे आहे.

शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,अशोक संकपाळ, दत्तात्रेय शिंदे, विजय शेजवळ, विजया टेमगिरे, आदी यावेळी उपस्थित होते.

पाहुण्याचा परिचय निखिल. मगर यांनी करून दिला.सूत्रसंचालन कल्पना काकडे व राजेंद्र मोरे यांनी केले तर आभार प्रा. सतीश धुमाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button