अपघात

वाहनाने दिलेल्या धडकेत दोन अल्पवयीन मुलांसह ज्येष्ठ महिलेच्या मृत्यू

  • शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आंबळे (ता. शिरूर) येथे हरिनाम सप्ताहातील कीर्तन ऐकून आनंदाने घरी परतणाऱ्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांसह एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. गुरुवारी (दि. २९) रात्री उशिरा न्हावरे-शिरूर रस्त्यावरील केसरी हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. धडक दिल्यानंतर जखमींच्या मदतीला न थांबता वाहनचालक वाहनासह पसार झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात कौशल्या वसंत झेंडे (वय ६१), सोहम राजीव झेंडे (वय १३) आणि आरुषी दत्तात्रय झेंडे (वय ११, सर्व रा. आंबळे, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. तर ज्योती राजीव झेंडे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबळे येथे सालाबादप्रमाणे हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहानिमित्त दररोज महाप्रसाद आणि कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत. गुरुवारी रात्री ज्योती झेंडे, त्यांच्या सासू कौशल्या झेंडे, मुलगा सोहम आणि शेजारी राहणाऱ्या चुलत जावेची मुलगी आरुषी हे चौघे कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशिरा ते न्हावरे-शिरूर रस्त्याच्या कडेने पायी घरी परतत होते.

दरम्यान, आंबळे गावाजवळील केसरी हॉटेलसमोर न्हावरे बाजूकडून शिरूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चौघेही रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सोहम आणि आरुषी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कौशल्या आणि ज्योती झेंडे यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शिरूर येथे हलविण्यात आले. कौशल्या झेंडे यांना श्रीगणेश हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्योती झेंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी मृतांचे नातेवाईक संतोष अनिल झेंडे (वय ३६, रा. आंबळे) यांनी न्हावरे पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button