शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या बळावर विविध क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या शिरूर परिसरातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्काराने गुरुवारी (२९ ऑक्टोबर) गौरव करण्यात येणार आहे. ‘डेली न्यूज पोस्ट २४’च्या वतीने आयोजित हा सोहळा सायंकाळी चार वाजता बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होणार आहे. यावेळी चोरट्याचा प्रतिकार करून वडिलांना मदत करणाऱ्या १२ वर्षीय मानवी छाजेड हिचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
साहित्य, शिक्षण, ग्रामविकास, उद्योजकता, अभिनय, क्रीडा आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल या उपक्रमातून घेण्यात आली आहे. नवरात्रीच्या काळात या महिलांचा संघर्ष आणि यशाची वाटचाल समाजासमोर मांडून त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विषयात सुवर्णपदक मिळविणाऱ्या प्रा. डॉ. क्रांती पैठणकर, आदर्श सरपंच व उद्योजिका वर्षा काळे, प्राचार्या अश्विनी घारू, लेखिका कविता पाचंग्रे, अभिनेत्री प्रतीक्षा बारवकर, राजमाता जिजाऊ अभ्यासिकेच्या प्रमुख प्रा. अलका बेलोटे (बोरुडे), सामाजिक कार्यकर्त्या प्रिया बिरादार, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले आणि क्रिकेटपटू आरती दसगुडे या नऊ महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शिरूरमधील आनंदनगर वसाहतीत १० ऑक्टोबर रोजी पहाटे चोरट्याने बंदुकीसह छाजेड यांच्या घरात प्रवेश केला होता. यावेळी अवघ्या १२ वर्षांच्या मानवी उमेश छाजेड हिने प्रसंगावधान राखत चोरट्याचा प्रतिकार केला आणि वडिलांना मदत केली. तिच्या धाडसाची दखल घेत श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने तिचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, नायब तहसीलदार स्नेहा गिरगोसावी, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सामाजिक कार्यकर्त्या राणीताई चौरे व उषाताई वाखारे आणि प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. नगरपालिकेतील विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे प्रमुख माध्यम प्रायोजक डेक्कन एज्युकेशन इंग्लिश व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, बाबुरावनगर, शिरूर हे आहेत. सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले आहे.