शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या हलवाई गणेशासमोर डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय उपक्रमामुळे परिसरात चैतन्यपूर्ण व मंगलमय वातावरण निर्माण झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी एकसुरात अथर्वशीर्षाचे पठण केले. यावेळी मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी अथर्वशीर्षाचे महत्त्व व महती विशद करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, उपाध्यक्ष वैभव लांडे, शरद मुसळे, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, अशोक काळे, प्रेम मुसळे, श्याम परदेशी,
अविनाश जाधव, प्रणव मुसळे, बाळासाहेब ढोबळे, सिंकदर मन्यार, रमणलाल मुसळे, नारायण काळे, श्याम कोळपकर, शिक्षक सखाराम पुरी आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष मयूर काळे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले, तर आभार अशोक काळे यांनी मानले.

हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. काही वर्षांपूर्वी विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून वाचलेल्या निधीतून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. उत्सव मंडप खड्डेविरहित ठेवण्याची परंपराही मंडळाने कायम राखली आहे. शहरात महिलांसाठी सामूहिक महिला आरतीचा उपक्रम सर्वप्रथम मंडळाने सुरू केला.
पर्यावरण संवर्धनासाठी महिला आरतीच्या वेळी महिलांना तुळशीसह देशी वृक्षांची रोपे भेट देण्यात येतात. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली जातात. गणेशोत्सव काळात बंदोबस्त व स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या
पोलिस तसेच नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्यातून सन्मान केला जातो. आरोग्य शिबिरे, जनजागृती, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप असे उपक्रमही मंडळातर्फे राबविले जातात.

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत ३५ हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाकाळात गरजू नागरिकांना अन्नधान्य किट, तसेच सांगली व महाड परिसरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत मंडळाने केली.
लोकवर्गणीतून हलवाई गणेशाला चांदीचे आभूषणे अर्पण करण्यात आली असून गणेशजयंतीच्या महाप्रसादासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. दरवर्षी पौराणिक, धार्मिक किंवा सामाजिक विषयांवरील देखावे सादर करण्याची परंपराही मंडळाने जपली आहे. विविध धर्मांचे नागरिक मंडळाच्या उपक्रमांत सहभागी होतात. पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनेही मंडळाच्या कार्याची दखल घेऊन गौरव करण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण, मुलांना खाऊवाटप तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची सांगड घालणारे मंडळ म्हणून हलवाई चौक गणेश मित्र मंडळाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

