Uncategorized

प्रेमविवाहाच्या रागातून दोन कुटुंबांत तुफान हाणामारी; दगडफेक, चावा आणि डोळ्यांत तिखट चटणी टाकून सात जणांना जखमी केल्याचा आरोप

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}मुलाने प्रेमविवाह करून पळून गेल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान मारहाणीत झाले. शिरूर शहरातील एस.टी. स्टँडजवळील जयराज लॉजसमोर शुक्रवारी (दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सात जणांना हाताने, दगडाने मारहाण करण्यासह चावा घेऊन आणि डोळ्यांत तिखट चटणी टाकून जखमी केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता उत्तम लक्ते (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. शिरूर) यांचा मुलगा महेश लक्ते याने आरोपींच्या मुलीशी प्रेमविवाह करून पळून गेल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून अनिता लक्ते, त्यांचे पती उत्तम लक्ते यांच्यासह अनिल कोळपे, माखा कोळपे, गणेश लक्ते, अक्षय शिंदे, सुनील कोळपे आणि राहुल कोळपे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी संबंधितांना हाताने व दगडाने मारहाण करण्यात आली, तसेच चावा घेऊन आणि डोळ्यांत तिखट चटणी टाकून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.‾

या प्रकरणी गणेश काशीनाथ शिंदे, माऊली संतप शिंगाडे, संतोष भाऊसाहेब गुलदगड, समीर सर्जेराव शेंडगे, राहुल भाऊसाहेब गुलदगड, दशरथ तुकाराम कोळपे, कैलास तुकाराम कोळपे, बाबुराव भाऊ कोळपे, भाऊ बाबुराव कोळपे, सतीश बाबुराव कोळपे, संपत बाळा शिंगाडे, पंखाबाई सर्जेराव शेंडगे, मनीषा दादाभाऊ शिंगाडे, स्वप्निल बाबुराव कोळपे, अर्चना गणेश शिंदे, लंकाबाई रामदास शिंदे, नारायण सतीश कोळपे आणि सुमित सर्जेराव शेंडगे अशा एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता उत्तम लक्ते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९० आणि १९१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खटिंग करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button