शिरूरच्या सुपुत्राची रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी निवड
किशोर राजे दत्तात्रय निंबाळकर यांच्या कार्याचा गौरव; प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा संस्थेला लाभ
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूरचे सुपुत्र, माजी सनदी अधिकारी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे दत्तात्रय निंबाळकर यांची प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरूरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून आनंद व्यक्त होत असून, विविध स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
किशोर राजे निंबाळकर यांनी प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, जळगावचे जिल्हाधिकारी यांसह महसूल व प्रशासन क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
अक्कलकोटचे तहसीलदार म्हणून १९८७ मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर सोलापूर व पंढरपूरचे प्रांताधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.
प्रशासकीय अनुभव, शैक्षणिक क्षेत्राची जाण आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांच्या निवडीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
शिरूरमध्ये सनशाईन सॅटर्डे क्लबचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही निंबाळकर कार्यरत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणून ज्ञान, साहित्य, कला, सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक देवाणघेवाणीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या उपक्रमातून सुरू आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची नवी जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि व्यापक कार्याचा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




