शिरूरच्या खूनप्रकरणातील तिन्ही आरोपी ४८ तासांत जेरबंद
डी.बी. पथकाची सूपा टोलनाक्याजवळ कारवाई; तिघांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातील लाटेआळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे १८ सप्टेंबर रोजी सकाळी झालेल्या गोळीबारात हरीश दादाभाऊ गंगावणे (वय ३४, रा. कामठीपुरा, शिरूर) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तिघा संशयित आरोपींना अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले. सूपा टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी रोहित रविंद्र सोनवणे (वय २४, रा. रांजणे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि आदित्य दादाभाऊ पवार (वय १९, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन लाख रुपयांच्या व्यवहारावरून जाब विचारल्याच्या कारणातून आरोपींमध्ये वाद झाला. त्यानंतर रोहित सोनवणे याने पिस्तुलातून हरीश गंगावणे यांच्यावर गोळी झाडून त्यांना गंभीर जखमी केले व त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३५१(२), ३५१(३), ३(५) तसेच शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सूपा टोलनाका परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व डी.बी. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींवर यापूर्वीही अवैध गावठी पिस्तुल बाळगणे, मारामारी व जबरी चोरी यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि नितीन कोनकर करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले आणि
पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, निखिल राऊत, अविनाश धारे, सचिन भाई, राहुल वाघमोडे, दादाराव नागरे, अजय पाटील आदींच्या पथकाने केली.



