शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहराबाहेरील पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील बायपास रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे. या मार्गावर भरधाव वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने ६० वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी संबंधित वाहनचालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर शहराबाहेरील पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पेट्रोल पंपाच्या पुढे सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा अपघात झाला. जयश्री शशिकांत आडाणे (वय ६०, रा. बाबुरावनगर, अष्टविनायक कॉलनी, शिरूर) या जात असताना एमएच १२ एसएल ९४९७ क्रमांकाच्या वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
वाहनचालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार ४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत.
शहराबाहेरील बायपास मार्गावर सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्याने या मार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.