राजकीय

शिरूरच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे यांची बिनविरोध निवड

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूरच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन पाचर्णे यांची शुक्रवारी (६ नोव्हेंबर) उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
शिरूर नगरपालिकेच्या २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ११ जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाच, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. या अपक्ष नगरसेवकाने अजित पवार यांच्या पक्षाला पाठिंबा दिला होता.सत्तास्थापनेच्या वेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत शिरूर नगरपरिषद गट या नाव्याने गट स्थापन करत सत्तेत आले होते. भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही विरोधी बाकांवर बसावे लागले होते. नगराध्यक्षपदी अजित पवार पक्षाच्या ऐश्वर्या अभिजित पाचर्णे या थेट जनतेतून निवडून आल्या होत्या.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उपनगराध्यक्षपदासह पाणीपुरवठा सभापती, महिला व बालकल्याण समिती चे उपसभापतीपद देण्यात आले .
दरम्यान, भाजपने शिरूर नगरपरिषद गटाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर पालिकेत नव्या घडामोडी घडल्या. उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. हा ठराव मंजूर झाल्याने उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगरपालिकेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी बी. जी. पाचर्णे, भाजपचे नेते धर्मेंद्र खांडरे, माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, एकनाथ शेलार, भगवान शेळके आणि बाबुराव पाचंगे अविनाश जाधव,यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी नितीन पाचर्णे यांच्या संयमी नेतृत्वाचा गौरव करत शिरूर शहराचा विकास हेच सर्वांचे सामूहिक ध्येय असल्याचे सांगितले. तर, सर्वांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नितीन पाचर्णे यांनी दिली.

यावेळी बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, एजाज बागवान, स्वाती साठे, नगरसेविका सुनीता भुजबळ, रिंकूताई जगताप, संगीता मल्लाव, पूजा पोटावळे, सविता राजापूरे, नगरसेवक संतोष थेऊरकर, सागर नरवडे, उमेश शेळके, निलेश पवार, राजेंद्र लोळगे, अभिजित पाचर्णे यांच्यासह माजी सरपंच वर्षा पोटावळे, विठ्ठल घावटे, वंदना पाचर्णे, सरपंच जगदीश पाचर्णे तसेच पाचर्णे समर्थक आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर नितीन पाचर्णे यांची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे सहभागी झाल्या होत्या.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नितीन पाचर्णे हे भाजपचे दिवंगत नेते व माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पुतणे आहेत. यापूर्वीही त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले असून, सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि संघटन कौशल्य ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. शिरूरच्या राजकारणात पाचर्णे परिवाराचे महत्त्व कायम राहिले आहे. विशेष म्हणजे, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे एकाच परिवाराकडे येण्याची ही दुर्मीळ घटना ठरली आहे. यापूर्वी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांचे सासरे गणेश पाचर्णे यांनीही उपनगराध्यक्षपद भूषविले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button