Uncategorized

वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्याने पाणी पुरवठा विस्कळीत

नवीन जलवाहिन्या, वाढीव क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, सक्षम वितरण व्यवस्था आणि तांत्रिक सुधारणांची गरज

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर शहराचा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून विस्कळीत झाला असतानाच साळुंके मळा येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मोती नाला येथील आश्रमशाळेची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना मंगळवारी (दि. २ नोव्हेंबर) मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्या, रखडलेल्या नवीन योजना आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन यामुळे शिरूरच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे.

शिरूर शहराला सध्या सन १९८५ मध्ये सुरु करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना सुरू झाली, त्यावेळी शहरात एक हजाराहून अधिक नळजोडण्या होत्या. मात्र, त्यानंतर शहराचे झपाट्याने नागरीकरण आणि विस्तार झाला. आज शहरातील नळजोडण्यांची संख्या तब्बल ६ हजार २३९ वर पोहोचली आहे. यामध्ये ६ हजार ७८ घरगुती, शासकीय, निमशासकीय, शाळा व दवाखाने ७७ तर ८४ हॉटेल व व्यापारी आस्थापनांच्या नळजोडण्यांचा समावेश आहे.

सामान्यतः पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या व संबंधित यंत्रणेचे आयुष्यमान सुमारे ३० वर्षे मानले जाते. शिरूरच्या विद्यमान योजनेला चार दशकांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे जलवाहिन्या व अन्य सामग्रीची झीज झाली असून, वाढत्या नळजोडण्यांचा ताण जुन्या यंत्रणेवर पडत आहे. परिणामी, वारंवार जलवाहिन्या फुटणे, दुरुस्तीची कामे करावी लागणे आणि शहराचा पाणीपुरवठा खंडित होणे, असे प्रकार घडत आहेत.

दरम्यान, या समस्येवर उपाय म्हणून शिरूर नगरपालिकेने सन २०१९ मध्ये हत्ती डोह ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ५०० एम.एम. व्यासाची नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले होते. या कामापैकी सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले; मात्र त्यानंतर हे काम रखडले. ही जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

दुसरीकडे, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन घोड धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ७१ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या या योजनेतील आतापर्यंत सात ते आठ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शिरूर शहरासह झपाट्याने विकसित होणाऱ्या उपनगरांचा आणि भविष्यात नगरपालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या भागांचाही पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी योजनेचे कामही अपेक्षित गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे.

सध्या शिरूर शहराला घोडनदीवरील हत्ती डोह येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध माहितीनुसार, या बंधाऱ्यातील पाणीसाठा १५ नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे शहरासाठी पाण्याचे नवीन आवर्तन मिळणे गरजेचे आहे. यासंदर्भात नगरपालिकेच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. बंधाऱ्यात पाण्याचे आवर्तन सोडल्यास पुढील सुमारे ४५ दिवस शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटू शकते. तसेच बंधाऱ्याच्या नदीपात्रातील गाळ व राडारोडा काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.

विशेष म्हणजे, घोडनदीच्या पात्रात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाअभावी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. दर गुरुवारी देखभाल व दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. नियमित देखभाल केली जात असतानाही वारंवार जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार कसे घडतात, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

कधी जलवाहिनी फुटल्याचे, कधी वीजपुरवठा खंडित झाल्याचे, तर कधी नदीपात्रात पाणी नसल्याचे कारण पुढे येते. वर्षभरात अनेकदा पाणीपुरवठा खंडित होत असतानाही नागरिकांना मात्र वर्षातील ३६५ दिवसांची पाणीपट्टी भरावी लागते. त्यातच अनेक कुटुंबांना पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.

शिरूर शहराची लोकसंख्या आणि नागरी विस्तार सातत्याने वाढत असताना पाणीपुरवठ्याची जुनी यंत्रणा त्याच पद्धतीने सुरू ठेवणे आता शक्य राहिलेले नाही. नवीन जलवाहिन्या, वाढीव क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, सक्षम वितरण व्यवस्था आणि तांत्रिक सुधारणांची गरज निर्माण झाली आहे. रखडलेल्या योजनांना गती देण्याबरोबरच उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा नदीपात्रात पाणी असूनही शिरूरकरांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ वारंवार येत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button