शिरूरमध्ये मध्यरात्री कोयता, स्क्रूड्रायव्हरसह दोघे पोलिसांच्या ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त
शिरूर { दिलो न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास घातक हत्यारे घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन तरुणांना शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, स्क्रूड्रायव्हर आणि मोटारसायकल असा एकूण ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला आहे. गुरुवारी (दि. ५) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास रामलिंग रोड ते नवीन नगरपरिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हार्द हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली.
राज रेखा आंधारे (वय २१, रा. शेळकेवस्ती, रांजणगाव) आणि सुजर संतोष उघडे (वय १९, रा. मोडकाई वस्ती, रांजणगाव गणपती) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे हार्द हॉस्पिटलजवळील अंधारात दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लोखंडी कोयता आणि हिरव्या रंगाची मूठ असलेला स्क्रूड्रायव्हर आढळून आला.
तसेच त्यांच्याकडील हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ३०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता, १०० रुपये किमतीचा स्क्रूड्रायव्हर आणि ५० हजार रुपये किमतीची MH-45-AB-2749 क्रमांकाची मोटारसायकल यांचा समावेश आहे.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ (अ) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

