अपघात

मलठणच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; गुनाटमध्ये ११ वर्षीय बालक गंभीर जखमी

अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक; गुनाटमध्ये मोटारसायकलस्वाराची बालकाच्या सायकलला धडक; दोन्ही अपघातांनंतर वाहनचालक पसार

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यात भरधाव आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघा तरुणांचा मृत्यू झाला, तर ११ वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे. मलठण येथे अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर गुनाट येथे भरधाव मोटारसायकलने सायकलवरून जाणाऱ्या बालकाला पाठीमागून धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, दोन्ही अपघातांनंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले.

मलठण गावच्या हद्दीत अष्टविनायक महामार्गावरील स्नेहल हॉटेलसमोर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) रात्री पावणे नऊच्या सुमारास पहिला भीषण अपघात घडला. या अपघातात अजय बाळू देवकर (वय २८, रा. कवठे येमाई, ता. शिरूर) आणि किरण अर्जुन चोरे (वय २४, रा. डोंगरगण, चोरेवस्ती, ता. शिरूर) या दोघांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण बाजूकडून कवठे येमाईच्या दिशेने जाणारी मारुती सुझुकी एर्टिगा कार (क्र. एमएच ०३ ईएफ ६५५९) भरधाव वेगाने जात होती. कारचालकाने निष्काळजीपणे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही तरुण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळीच कार सोडून पलायन केले. याप्रकरणी सुरेश मारुती चोरे (वय ४७, रा. डोंगरगण, चोरेवस्ती) यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना गुनाट येथे गुनाट-शिंदोडी रस्त्यावर मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) दुपारी ४.१० वाजण्याच्या सुमारास घडली. कृष्णा विलास आडसुरे (वय ११, रा. शिंदोडी रोड, गुनाट) हा बालक सायकलवरून जात असताना भरधाव मोटारसायकलने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कृष्णा याच्या डोक्याला, नाकाला, तोंडाला व हनुवटीला गंभीर दुखापत झाली असून, हात-पायांनाही मार लागला आहे. त्याच्या सायकलचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर मोटारसायकलचालक बाल्या चव्हाण (पूर्ण नाव माहीत नाही, रा. शिंदोडी, पो. निमोणे, ता. शिरूर) हा जखमी बालकाला मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी भाऊसाहेब पोपट आडसुरे (वय ४५, रा. गुनाट) यांच्या फिर्यादीवरून संबंधित मोटारसायकलचालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलठण अपघातप्रकरणी गु.र.नं. १००८/२०२६, तर गुनाट अपघातप्रकरणी गु.र.नं. १००५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दोन्ही अपघातांतील वाहनचालकांनी जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मलठण अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक खटिंग करीत आहेत, तर गुनाट अपघाताचा तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत. दोन्ही प्रकरणांतील वाहनचालकांचा शोध शिरूर पोलीस घेत आहेत.

दोन तरुणांचा मृत्यू आणि एका बालकाला गंभीर दुखापत झाल्याच्या या घटनांमुळे शिरूर तालुक्यात भरधाव व निष्काळजी वाहनचालकांच्या बेदरकारपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button