शिरूरमध्ये कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेकडून ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा! ज्येष्ठांच्या आरोग्य, शासकीय सुविधा आणि सामाजिक योगदानावर इंजि. मनोहर पोकळे यांचे मार्गदर्शन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पेन्शनमधून मदतीचे आवाहन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, त्यांचे हक्क, शासनाच्या विविध सुविधा आणि समाजातील त्यांचे योगदान याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटना, तालुका शाखा शिरूर यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे सुमारे ४० सभासद उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा पुणे येथील निवृत्त मुख्य अभियंता व मंत्रालयाचे सहसचिव इंजि. मनोहर पोकळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजना, आरोग्यविषयक प्रश्न, विविध सवलती आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शंकांचे सविस्तर निरसन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे शिरूर तालुका शाखेचे विशेष अध्यक्ष कुंडलिक कारखिले यांनी प्रमुख पाहुणे इंजि. मनोहर पोकळे यांचे स्वागत केले. डी. एन. गायकवाड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व सभासदांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
मार्गदर्शन करताना इंजि. पोकळे यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सुविधा, सवलती आणि कायदे यांची माहिती देतानाच ज्येष्ठांचे वाढते आयुर्मान, आरोग्याच्या समस्या, आयुर्विमा, आयुष्मान कार्ड तसेच एनसीएमसी कार्ड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.I
यावेळी १५ नोव्हेंबर रोजी शिरूर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आरोग्यदायी माय मराठी’ या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. दैनंदिन जीवनात साधे व्यायाम आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास निरोगी जीवन जगण्यास कशी मदत होते, याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन अनेक सभासदांनी या उपक्रमासाठी नावनोंदणी केली.
राज्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी शासनाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या परिपत्रकाद्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे आवाहन केले आहे. याच सामाजिक जाणिवेतून निवृत्त पेन्शनधारकांनीही आपल्या एक दिवसाच्या पेन्शनची रक्कम देणगी म्हणून द्यावी, असे आवाहन इंजि. पोकळे यांनी केले.
या आवाहनाला उपस्थित सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जगन्नाथ जावळे यांनी १ हजार ३०० रुपये रोख स्वरूपात, तर निवृत्त उपविभागीय अधिकारी इंजि. आर. पी. वाव्हळ यांनी १ हजार ७०० रुपये जी-पेद्वारे इंजि. भारत बेंद्रे यांच्याकडे जमा केले. इतर सभासदांनीही लवकरात लवकर मदत जमा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे कार्याध्यक्ष इंजि. भारत बेंद्रे यांनी केले. सभासद वसंत शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ज्येष्ठांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्याबरोबरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्शही संघटनेने घालून दिला.