क्राईम

मलठणमध्ये मध्यरात्री दरोडा; घरात घुसून वृद्धांना बेदम मारहाण, सोन्याचे दागिने लुटले

चार मुखवटाधारी चोरट्यांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याचे फुल ओढून नेले**

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}शिरूर तालुक्यातील मलठण येथील दंडवतेदरा परिसरात मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या चुलतीला मारहाण करत एक लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेल्याची घटना  मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मलठण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत नामदेव एकनाथ दंडवते (वय ४७, रा. दंडवतेदरा, मलठण) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील एकनाथ ठकुजी दंडवते, आई यमुनाबाई एकनाथ दंडवते आणि चुलती लहानुबाई किसण दंडवते हे घरात झोपलेले असताना रात्री घराच्या कडीचा आवाज आला. त्यामुळे यमुनाबाई यांनी दरवाजा उघडला असता, तोंड बांधलेले व अंगात जर्किन घातलेले तीन अनोळखी इसम घरात घुसले, तर त्यांचा एक साथीदार घराच्या ओट्यावर थांबला होता.

घरात घुसलेल्या चोरट्यांनी लाकडी काठी आणि कोयत्याच्या मुठीने तिघांनाही मारहाण केली. यावेळी एका चोरट्याने यमुनाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि उजव्या कानातील सोन्याचे फुल जबरदस्तीने ओढून घेतले. यामुळे त्यांच्या कानाला दुखापत झाली. त्यानंतर चारही चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेत दीड तोळे वजनाचे अंदाजे एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि आठ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे फुल, असे एकूण एक लाख २८ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३०९(६), ३३३, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खटींग तपास करत असून, चारही अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button