क्राईम

मालकाच्या हत्येची सुपारी; निष्पाप कामगाराचा गोळीबारात बळी हमजा शेख हत्या प्रकरणाचा उलगडा; पाच जण अटकेत, दोघांचा शोध सुरू

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}कारेगाव (ता. शिरूर) येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लँटमध्ये काम करणाऱ्या हमजा उस्मान शेख (वय ३९) यांचा गोळी झाडून खून केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. विकास नवले यांच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या सुपारीत चुकीच्या व्यक्तीची ओळख झाल्याने त्यांच्या कामगाराचा बळी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सार्थक संदेश कोहकडे, तुषार अजय तोडकर, संतोष मधुकर मांजरे, विठ्ठल नवनाथ पिकळे आणि योगेश विलास इडोळे या पाच जणांना अटक केली असून पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव हे दोघे फरार आहेत.

पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हमजा शेख हे नेहमीप्रमाणे कारेगाव येथील पाण्याच्या प्लँटमध्ये कामावर गेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला.

तपासात सार्थक कोहकडे याचा विकास नवले यांच्याशी जागेवरून वाद असल्याचे समोर आले. नवले यांच्या हत्येसाठी सार्थकने तुषार तोडकरला सुपारी दिली. पुढे तुषारने ही सुपारी पिंपरी-चिंचवड येथील सराईत तडीपार गुन्हेगार संतोष मांजरे याला दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. संतोषने पवन हुंडारे, पृथ्वी जाधव, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांच्या साथीने हत्येचा कट रचला.

मात्र, हल्लेखोरांनी विकास नवले समजून त्यांच्या पाण्याच्या प्लँटमध्ये काम करणाऱ्या हमजा शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामुळे नवले यांच्या हत्येच्या सुपारीत निष्पाप कामगार हमजा शेख यांचा बळी गेला.

तपास पथकात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

तपास पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महादेव शेलार, सपोनि मोरडे, पोसई महेश डांगरे, रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोसई तिडके, पोसई थोरात, तसेच पोलिस अंमलदार शरद बांबळे, संजय पड्याळ, दीपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ यांचा सहभाग होता.

रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार विलास आंबेकर, उमेश कुतवळ, योगेश गुंड, रासकर, शिवणकर, संतोष साळुंखे, दत्तात्रय शिंदे तसेच खेड पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार संकेत कवडे यांनीही तपासात सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button