Uncategorizedक्राईमसंपादकीय
गोळीबाराच्या घटनांनी शिरूर हादरले; गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम,:24} शांतताप्रिय आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर शहरासह तालुक्यात मागील काही महिन्यांत घडलेल्या गोळीबार, मारहाण, शस्त्रांचा वापर, अंमली पदार्थांचे सेवन व व्यापार, अवैध दारू-जुगार तसेच चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा न घातल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शिरूर परिसरात गावठी कट्टे आणि अन्य शस्त्रांची उपलब्धता हा चिंतेचा विषय बनला आहे. किरकोळ वादातूनही शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी या शस्त्रांचा पुरवठा कुठून होतो, स्थानिक पातळीवर त्यांची विक्री कोणामार्फत होते, याचा तपास करून त्यामागील सूत्रधारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अलीकडील काही घटनांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. कर्डे घाट परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी शिरूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात पहाटे गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला. त्यानंतर रांजणगाव परिसरातील मारहाणीची घटना आणि कारेगाव येथे पाण्याच्या प्लांटवरील तरुणावर झालेला गोळीबार या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
‘खाकी’चा धाक कायम राहण्याची गरजगुन्हेगारीच्या या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस ठाण्यातील दोन हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकल्याच्या घटनाही चर्चेत आहेत. एका हवालदाराला ११ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले, तर दुसरा हवालदार ९५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर सापळ्याची चाहूल लागल्याने रक्कम घेऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस दलातील अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा धाक आणि विश्वास दोन्ही कायम राहणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिरूर शहर व परिसरात अंमली पदार्थांच्या सेवनाबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शिरूरच्या लगत कारेगाव परिसरात औद्योगिक वसाहतीचा विस्तार झाल्यानंतर आर्थिक उलाढाल वाढली आहे. शिरूर हे शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यांसाठी महत्त्वाचे बाजारपेठेचे केंद्र आहे. त्यामुळे शहराची शांतता आणि सुरक्षितता ही केवळ नागरिकांच्या जीवनाशी नव्हे, तर परिसराच्या आर्थिक विकासाशीही संबंधित आहे.
शिरूर शहर आणि पंचक्रोशीचा वाढता विस्तार लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याची मागणीही पुढे आली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिक विस्तार आणि वाढता पोलिसी व्याप लक्षात घेता स्वतंत्र पोलीस यंत्रणा आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच शिरूरचे उपविभागीय पोलीस कार्यालय सध्या एमआयडीसी परिसरात कार्यरत असून, ते महसुली तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शिरूर शहरात स्थलांतरित करावे, अशी मागणी होत आहे. नवीन पोलीस ठाणे सुरू झाल्याने जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेचा या कार्यालयासाठी उपयोग करता येऊ शकतो, अशी सूचनाही करण्यात येत आहे.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नियमित कोंबिंग ऑपरेशन राबवून गावठी कट्टे, बेकायदा शस्त्रे, अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरोधात व्यापक कारवाई करावी. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवू नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
नागरिकांच्या सहकार्याशिवाय गुन्हेगारीला आळा घालणे शक्य नाही. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून माहिती देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी आणि नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी. ‘भयमुक्त आणि सुरक्षित शिरूर’साठी पोलीस, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
