विशेषसांस्कृतिक

बालस्वरांनी उजळली ‘सांज दीपावली’; सुरेल गीतांनी शिरूरकर मंत्रमुग्ध

ओंकार संगीत विद्यालयाच्या बालगायकांची हिंदी-मराठी गीतांची बहार; स्वर, ताल आणि सुरांच्या संगमात रंगली दिवाळीची संध्याकाळ

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}दीपावलीचा उत्सव म्हणजे केवळ दिव्यांचा लखलखाट नव्हे, तर आनंद, उत्साह आणि आनंदक्षणांची मनमुराद उधळण. याच आनंदाला सुरांची सुंदर किनार लाभली आणि बालगायकांच्या निरागस, सुरेल आवाजांनी शिरूरकरांची दिवाळीची संध्याकाळ अविस्मरणीय केली. गणेश मराठे संचलित ओंकार संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित ‘सांज दीपावली २०२६’ या संगीतमय मैफलीत बालकलाकारांनी आपल्या गायनकलेने रसिकांची मने जिंकली.

बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात ही मैफल रंगली. जुन्या हिंदी चित्रपटगीतांपासून नव्या गाण्यांपर्यंत विविध गीतांचा सुरेल नजराणा बालगायकांनी सादर केला. प्रत्येक गाण्यातील भाव, स्वरांची नजाकत, हरकती आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यामुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. बालगायकांच्या आवाजातून उमटणाऱ्या सुरांनी जणू संगीताचे दीपच प्रज्वलित केले. प्रत्येक सादरीकरणानंतर रसिकांकडून मिळणारी टाळ्यांची दाद कलाकारांचा उत्साह वाढवत होती.

नंदिनी राऊत हिने ‘कहना है क्या’, मंजिरी नेवासकर हिने ‘जिंदगी के सफर में गुजर जाते हैं’, जान्हवी जैस्वाल हिने ‘बडे अच्छे लगते हैं’, गार्गी काळे हिने ‘ले गई ले गई दिल ले गई’, हृदया क्षीरसागर हिने ‘हवा हवाई’, अलभ्या क्षीरसागर हिने ‘मेरा नाम चिन चिन चू’, श्रावणी बनकर हिने ‘ओ साथी रे, तेरे बिना क्या जीना’, अथश्री फुलफगर हिने ‘सोला बरस की बाली उमर को सलाम’, यश गावडे याने ‘तोरे नैना दगाबाज रे’ ही गीते सादर केली.

आराध्या मुदुली हिने ‘तू जो मिला’, काव्या सोळंके हिने ‘उनसे मिली नजर’, उत्कर्ष मुटकुळे याने ‘किसी की मुस्कुराहटों पे’, ऋतवा जावळे हिने ‘है अपना दिल तो आवारा’, गिरिजा साळुंके हिने ‘ऐसी पहेली जिंदगी’, ऋग्वेद पठारे याने ‘जिंदगी एक सफर है सुहाना’, श्रुती टाक हिने ‘तू है तो दिल धडकता है’, लक्ष्मी गायकवाड हिने ‘बहुत प्यार करते हैं तुमको सनम’, तनिष्का नवले हिने ‘पल एक पल में ही थम सा गया’ आणि सायली चत्तर हिने ‘कुछ ना कहो’ ही गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.

या मैफलीला शिरूरमधील स्थानिक कलाकारांसोबत अहिल्यानगर येथील प्रसिद्ध तबला व ढोलकीवादक अजित गुंदेचा आणि सिंथेसायझरवादक दिलावर यांनी सुरेल साथसंगत केली. अत्याधुनिक ध्वनियंत्रणेची जोड मिळाल्याने प्रत्येक गीताचा स्वर अधिक खुलून आला. या मैफलीचे सूत्रसंचालन नीता गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमास पी. एन. गाडगीळ अँड सन्सच्या शिरूर शाखेचे व्यवस्थापक नितीन बेल्हेकर,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी प्राचार्य डॉ. आर. एस. जैन, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सदानंद गायकवाड, डॉ. आनंद क्षीरसागर, आशिष जावळे, सेवानिवृत्त शिक्षिका संध्या कुलकर्णी, डॉ. शिल्पा घोडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी पी. एन. गाडगीळ अँड सन्स हे प्रायोजक, तर डेक्कन स्कूल, शिरूर आणि समर्थ सेवा मंडळ, शिरूर हे सहआयोजक होते. ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक गणेश मराठे, डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार आणि समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष व्ही. डी. कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

बालकलाकारांच्या सुरेल सादरीकरणातून उमटलेला आनंद, रसिकांच्या टाळ्यांचा गजर आणि संगीताच्या साथीने उजळलेली ती संध्याकाळ अशा वातावरणात ‘सांज दीपावली २०२६’ ही मैफल शिरूरकरांच्या स्मरणात राहणारा सांगीतिक दीपोत्सव ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button