राजकीय

वेळेवर उपस्थित राहत नसलेल्या विभाग प्रमुख यांच्या वर कारवाईची सर्वसाधारण सभेत मागणी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24} शिरूर नगरपालिकेतील विभागप्रमुख वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा सत्ताधारी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शहरातील शाळा, रस्ते, ड्रेनेज, अग्निशमन वाहन, दिशादर्शक फलक आणि विविध विकासकामांबाबत महत्त्वाचे प्रस्ताव सभेत मांडण्यात आले.

शिरूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा रसिकलाल धरिवाल सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

सभेदरम्यान स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती एजाज बागवान तसेच बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव यांनी विभागप्रमुख अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. “नगरसेवक वेळेवर येत असताना अधिकारी उशिरा येतात, ही बाब गंभीर असून संबंधितांवर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

नगरसेवक सागर नरवडे यांनी पालिकेच्या शाळांमध्ये मैदान व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी प्रायोजकांवर अवलंबून न राहता पालिका निधीतूनच कामे करावीत, अशी सूचना केली . यावर मुख्याधिकारी प्रीतमकुमार पाटील यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

नगरसेवक संतोष थेऊरकर यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान संदर्भात सूचना मांडली. नगरसेवक नितीन पाचर्णे, सभापती डॉ. सुनीता पोटे, रवींद्र ढोबळे, अभिजित पाचर्णे, चारुशीला कोळपकर यांनीही विविध विकासकामांबाबत सूचना केल्या.

सभेत आर्थिक वर्ष २०२५-२६ चे लेखे द्विनोंद पद्धतीने लिहिण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

संगणक विभागांतर्गत सीसीटीव्ही प्रणाली, संगणक साहित्य देखभाल व दुरुस्ती, तसेच विद्युत विभागातील लिफ्ट, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, यूपीएस आणि विद्युत व्यवस्थेच्या वार्षिक निविदांबाबतही सभेत चर्चा झाली.

लाटेआळी येथील शाळा क्रमांक १ च्या नवीन इमारतीच्या संपूर्ण विद्युतीकरणासह फर्निचर व इतर कामांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत मिळालेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून मराठी शाळांच्या दर्जोन्नतीसाठी कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सभेत शिरूर नगरपरिषदेचे १७ वर्षे जुने अग्निशमन वाहन बदलून नवीन बहुउद्देशीय अग्निशमन वाहन खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्याबाबत चर्चा झाली. जुने वाहन तांत्रिकदृष्ट्या निकामी होत असून देखभाल खर्च वाढल्याने नवीन वाहनाची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

पालिकेच्या विविध शाळांसाठी कबड्डी, खो-खो आणि कुस्ती मैदान उभारण्यासाठी लालमाती पुरवठ्याच्या वार्षिक निविदेचाही विषय सभेपुढे ठेवण्यात आला. तसेच नगरोत्थान योजनेअंतर्गत पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत एसबीआय कॉलनी परिसरात ३० लाख रुपयांच्या निधीतून सर्व्हिस रोड उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

शहरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी दिशादर्शक व ‘नो पार्किंग’ फलक उभारण्याचा निर्णयही चर्चेत आला. याशिवाय विविध प्रभागांमध्ये ड्रेनेज पाईपलाईन, पेव्हर ब्लॉक, कॉंक्रिट रस्ते आणि पावसाळी गटारांच्या कामांचे प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button