महाराष्ट्रविशेष

परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ : वर्षा काळे

शिरूर येथे परिचारिका दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: “सेवा, समर्पण आणि रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून परिचारिका कार्य करतात. समाजाने त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन साईदीप एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त तथा माजी सरपंच वर्षा काळे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सूर्योदय कॉलेज ऑफ नर्सिंग येथे पोस्टर स्पर्धा, परिचारिका विद्यार्थिनींचा सन्मान आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक परिचारिका सेवेच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लोरन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ मे रोजी हा दिवस परिचरिका दिन म्हणून साजरा केला जातो.

कार्यक्रमास भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा पदाधिकारी राजू शेख, प्राचार्य तुषार थोरात, वृषाली शिंदे, रेखा ठोंबरे, गौरी गोडबोले, दीप्ती जाधव, प्रा. सतीश धुमाळ आदी उपस्थित होते.

वर्षा काळे म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना परिचारिका शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शिरूरमध्ये नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे. रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रे, आपत्कालीन सेवा, प्रसूती विभाग तसेच शालेय आरोग्य सेवांमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

कोविड-१९ महामारीच्या काळात परिचारिकांनी जीव धोक्यात घालून दिलेली सेवा समाज कधीही विसरू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनासाठी वेगळी संकल्पना जाहीर केली जाते. त्यामध्ये परिचारिकांचे आरोग्य, सुरक्षितता, प्रशिक्षण, नेतृत्व आणि आरोग्य व्यवस्थेतील योगदान यावर विशेष भर दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यात परिचारिकांचा मोठा वाटा असून “रुग्णसेवाच ईश्वरसेवा” या भावनेतून त्या कार्यरत असल्याचे गौरवोद्गार काळे यांनी काढले.

यावेळी पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. काही विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे महत्त्व आणि इतिहास याविषयी माहिती सादर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य तुषार थोरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू शेख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button