मराठी वाड़.मय मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, साहित्यिक जाणीवांना दिशा देणारे एक मुक्त व्यासपीठ – डॉ. तुकाराम रोंगटे*
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर येथील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आदिवासी व लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते.
उद्घाटनपर मनोगतात डॉ. तुकाराम रोंगटे यांनी मानवी जीवनातील साहित्याचे महत्त्व स्पष्ट केले. “जे लाजवतं, माजवतं आणि खाजवतं ते साहित्य”, असे सांगत साहित्य हे केवळ कल्पनारंजन करणारे नसून समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब मांडणारे माध्यम
असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्य हे समाजमनाचा आरसा असून मराठी साहित्याने विविध सामाजिक स्तरांतील जीवनानुभव आणि संवेदना प्रभावीपणे व्यक्त केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
मराठी वाङ्मय मंडळ हे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, व्यासपीठ देणारे साहित्याची आवड निर्माण करणारे आणि मराठी भाषेविषयी अभिमान जागवणारे एक सर्जनशील व्यासपीठ आहे. मंडळाच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या विविध साहित्यिक,
सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवतात, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठीतील निसर्गकाव्य, विडंबनकाव्य तसेच दलित आदिवासी, स्त्रीवादी ग्रामीण साहित्य आणि विशेषतः दलित कवितेतून व्यक्त झालेल्या सामाजिक संवेदना यावरही भाष्य केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा वेध घेत विद्यार्थ्यांनी मराठी वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून आपल्या विविध कलागुणांना वाव द्यावा, तसेच साहित्याशी सर्जनशील नाते निर्माण करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे यांनी मराठी वाड्मय मंडळाची भूमिका व महत्त्व विशद करत मराठी वांग्मय मंडळ हे केवळ कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर इतरही शाखेच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना कसे
विचारपीठ उपलब्ध करून देते यातून विद्यार्थी कसे घडतात याविषयी विवेचन केले. वक्त्यांचा परिचय प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. क्रांती गोसावी -पैठणकर यांनी केले, तर आभार डॉ. बाळासाहेब देविकर यांनी मानले.
याप्रसंगी डॉ . विजय केसकर डॉ. ब्रिजेश तांबे, डॉ. समाधान बोरसे, डॉ. ईश्वर पवार, डॉ. श्रीपाद जोशी तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.