Uncategorized

सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असली पाहिजे

सनशाईन सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलताना सुहास फडके

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: “सीमेवर सैनिक रात्रंदिवस देशाचे संरक्षण करत असल्यामुळेच आपण सुरक्षित जीवन जगू शकतो. त्यामुळे सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असली पाहिजे,” असे प्रतिपादन सेवानिवृत्त बँक अधिकारी व व्याख्याते सुहास फडके यांनी केले.

येथील सनशाईन सॅटर्डे  क्लबच्या वतीने आयोजित ‘कारगिल युद्ध विजय गाथा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, आरोग्य सेवा विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. प्रेमचंद कांबळे, डॉ. गिरीश वायतळकर, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, संगीता किशोरराजे निंबाळकर, स्वाती फडके, डॉ. अनिल सोळुंके, डॉ. अनिता सोळुंके आदी उपस्थित होते.

फडके यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी, तेथील प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि भारतीय सैन्याने दाखविलेल्या शौर्याची माहिती दिली. “कारगिल युद्ध हे केवळ लढाई नव्हती , तर धैर्य, नियोजन आणि जिद्दीचे प्रतीक होते,” असे ते म्हणाले. सैन्यदलातच नव्हे, तर प्रत्येकाच्या आयुष्यात नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

“आपण ज्या क्षेत्रात काम करतो, तेथे प्रामाणिकपणे व सजगतेने काम करणे हीदेखील देशसेवाच आहे,” असे सांगताना त्यांनी तणावमुक्त जीवनासाठी सकारात्मक विचारांची गरज व्यक्त केली. “सुख हवे असते; मात्र त्यासाठी आवश्यक कष्ट घेण्याची तयारी अनेकदा नसते. लक्ष्य निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. अनिता सोळुंके यांनी करून दिला. आभार डॉ. अनिल सोळुंके यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button