Uncategorizedराष्ट्रीयविशेष

साकळाई योजनेला घोड धरणातून पाणी देण्यास विरोध; योजना विसापूर धरणातूनच राबवावी – बाळासाहेब घाडगे

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}घोड धरणातून अहिल्यानगर जिल्ह्यातील गावांसाठी प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेला शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब घाडगे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. घोड धरणातील पाणी साकळाई योजनेसाठी वळविल्यास शिरूर तालुक्यातील शेती, औद्योगिक क्षेत्र तसेच विविध गावांच्या पिण्याच्या पाणी योजनांवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे ही योजना घोड धरणाऐवजी विसापूर धरणातून राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

घोड धरणाची सध्याची जलसाठा क्षमता आणि भविष्यातील गरजा लक्षात न घेता काही लोकप्रतिनिधी राजकीय स्वार्थातून साकळाई योजना घोड धरणातून राबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप घाडगे यांनी केला. घोड धरणाची क्षमता सुमारे १० टीएमसी असली तरी गाळ व वाळू साचल्यामुळे प्रत्यक्ष साठवण क्षमता घटली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाण्यावर अतिरिक्त ताण देणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

कुकडी साखळी प्रकल्पात ३८.३९ टीएमसी पाण्याची उपलब्धता असताना साकळाई योजना विसापूर धरणातून राबविल्यास शासनाचा खर्चही कमी होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच या विषयावर निर्णय घेण्यापूर्वी शिरूर तालुक्यातील शेतकरी आणि स्थानिक लाभार्थ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले.

घोड धरणातील पाण्यावर शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील ३९ गावे, सुमारे ४५ हजार एकर शेती, शिरूरची पंचतारांकित औद्योगिक वसाहत तसेच अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. भविष्यात शिरूर तालुक्यात औद्योगिक विस्तार आणि नागरीकरण वाढणार असल्याने पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. अशा वेळी धरणातील पाणी इतर भागाकडे वळविण्याचा निर्णय स्थानिकांसाठी अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो, असे घाडगे यांनी सांगितले.

साकळाई योजना घोड धरणातून राबविण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी संघटना तीव्र आंदोलन उभारेल आणि हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

चौकट : काय आहे साकळाई उपसा सिंचन योजना?

घोड प्रकल्प हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या “ऊर्ध्व भीमा” प्रदेशांतर्गत असून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे घोड नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम १९६५ मध्ये पूर्ण झाले.

मूळ प्रकल्प अहवालानुसार घोड धरणाची एकूण साठवण क्षमता २१६.३० दशलक्ष घनमीटर (७.६३ टीएमसी) असून उपयुक्त पाणीसाठा १५४.८० दशलक्ष घनमीटर (५.४६ टीएमसी) आहे. मंजूर प्रकल्पानुसार सिंचनासाठी १० टीएमसी पाणी वापराची तरतूद करण्यात आली आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाच्या अनुषंगाने केंद्रीय जल आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार प्रकल्पासाठी वार्षिक १०.४० टीएमसी पाणी वापराची तरतूद आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांमधील तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि साठवण बंधारे भरण्यासाठी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साकळाई उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १२ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी १.६ टीएमसी आणि पिण्यासाठी ०.२ टीएमसी, असे एकूण १.८ टीएमसी पाणी घोड धरणातून उचलण्याचा प्रस्ताव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button