यशस्वी जीवनासाठी ताण-तणावाचे व्यवस्थापन आवश्यक : प्रिया लंघे

- oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे ताण-तणावाचे प्रमाण वाढत असून यशस्वी आणि आनंदी जीवनासाठी ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन समुपदेशक प्रिया लंघे यांनी केले.
येथील सनशाईन सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सनशाईन क्लबचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, प्राचार्य डॉ. अमोल शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रिया लंघे म्हणाल्या की, सध्या पालकांना मुलांच्या भवितव्याची चिंता, सामाजिक बदल, आर्थिक अडचणी आणि वाढत्या अपेक्षा यांसारख्या विविध कारणांमुळे तणावाला सामोरे जावे लागते. बदल होणे आपल्या हातात नसते, मात्र त्या बदलांना सकारात्मकपणे सामोरे जाणे आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक असते.
आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्याची सवय लावल्यास मन मोकळे होते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव निर्माण करणाऱ्या कारणांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. आनंद ही अनुभूती आहे. आपल्या आयुष्यात काय नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
‘मी स्वतःवर प्रेम करतो’ ही भावना जोपासणे आवश्यक आहे. आपल्या चांगल्या-वाईट कृतींची जबाबदारी स्वीकारावी. चूक झाल्यास ‘सॉरी’ म्हणण्याची आणि मदत मिळाल्यास ‘धन्यवाद’ व्यक्त करण्याची सवय लावल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतात, असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षेत यश संपादन केलेल्या विधी विनोद बोथरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी प्रिया लंघे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले, तर आभार पल्लवी शहा यांनी मानले.