Uncategorized

आठवडे बाजारात पोलिसांची पाहणी; नाकाबंदीत वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात शनिवारी भरलेल्या आठवडे बाजाराची शिरूर पोलिसांनी पाहणी करत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पेट्रोलिंग केले. बाजारात होणारी गर्दी लक्षात घेऊन मोबाईल चोरी, दागिने चोरी तसेच इतर मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली.

शनिवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान पोलिसांनी बाजार परिसराला भेट दिली. शिरूर शहरासह पंचक्रोशीतील नागरिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने खरेदी-विक्रीसाठी या बाजारात येत असल्याने परिसरात मोठी वर्दळ असते. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाजारात गस्त घालत नागरिकांशी संवाद साधला. शेतकरी व ग्राहकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या सूचनांची नोंद करण्यात आली.

बाजार व्यवस्थापनाशी संबंधित विविध बाबींवर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मार्केट यार्ड प्रशासनाला लेखी पत्राद्वारे सूचना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच बाजाराच्या दिवशी वाढणारी वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी आणि पार्किंग व्यवस्थापन याबाबत शिरूर नगरपालिकेशी समन्वय साधून उपाययोजनांवर चर्चा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसह बाजार परिसरातील शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.दरम्यान, सकाळी 11 ते 11.30 या वेळेत पाबळ फाटा चौक आणि एस.टी. स्टँड चौक येथे विशेष नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईत ब्लॅक फिल्म लावलेली वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहन परवाना नसलेले चालक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button