विशेषशैक्षणिक

‘तू आहेस ना’ संवादातून आई–मुलींच्या नात्याला मायेची नवी उब

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}“ज्यांना आई नसते त्यांना स्वप्नांशिवाय पर्याय नसतो. ज्यांना आई आहे त्यांनी तिची जपणूक करा,” असे कळकळीचे आवाहन प्रख्यात कवयित्री, गजलकार व सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले. आईच्या मायेचा, संघर्षाचा आणि आधाराचा अर्थ उलगडणारा हा भावस्पर्शी संवाद शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अनुभवायला मिळाला.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या बोरा महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंचातर्फे आयोजित ‘माझी आई माझ्या कॉलेजात – तू आहेस ना’ या मुक्त संवाद कार्यक्रमात आई–मुलींच्या नात्याची हळवी, पण बळ देणारी बाजू स्पष्ट झाली. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या वारशाला पुढे नेणाऱ्या ममता सिंधुताईं सपकाळ यांनी आईपणाचा अर्थ सांगितला. संघर्षातून उभे राहण्याची ताकद, ‘कोणी तरी आपल्या पाठीशी आहे’ ही खात्री आणि शब्दांतून झिरपणारी माया या साऱ्यांनी उपस्थित विद्यार्थिनी व मातांच्या मनात नवी उमेद पेरली.

 ‘तू आहेस ना’ या साध्या पण हृदयस्पर्शी आश्वासनातून पुढे जाण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांनी नमूद केले. ‘माझी आई माझ्या कॉलेजात’ हा उपक्रम आई–मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, आईच्या आठवणींना उजाळा दिला आणि आईला जपण्याचे आवाहन  केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते . विद्यार्थिनी मंचाच्या समन्वयक डॉ. क्रांती पैठणकर यांनी प्रास्ताविक केले.

निकम यांनी सांगितले की, गेली २५ वर्षांहून अधिक काळ हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, सध्या महाविद्यालयात सात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; त्यापैकी चार हजारांहून अधिक विद्यार्थिनी आहेत. “महिलांचा विकास म्हणजे समाजाचा विकास. समाजव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवणारा हा उपक्रम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य मोहिते यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

आईच्या मायेची उब, शब्दांतून झिरपणारी संवेदना आणि जीवनाला दिशा देणारा संवाद—या तिन्हींचा संगम असलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या मातांसाठी आठवणींचा ठेवा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुषा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पल्लवी ताठे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button