Uncategorized

स्मार्ट वीजमीटरविरोधात शिरूरमध्ये ग्राहक एकवटणार; वाढीव बिलांबाबत तीव्र नाराजी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरात घरगुती वीज ग्राहकांच्या जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट वीजमीटर बसविण्याची मोहीम सुरू असताना अनेक ग्राहकांनी त्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करत या प्रश्नावर एकत्रित लढा उभारण्याचा इशारा शिरूर नगरपरिषद शिक्षण समितीचे माजी उपसभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे.

शहरातील अनेक भागांत महावितरणकडून जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, नवीन मीटर बसविल्यानंतर वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा दावा अनेक ग्राहकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत तसेच त्याच्या अचूकतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.

ग्राहकांचे नेमके आक्षेप काय?

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, मीटर बदलण्यासाठी येणारे कर्मचारी अचानक घरी येऊन जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवितात. अनेक ठिकाणी ग्राहकांची संमती घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, जुन्या मीटरमध्ये कोणताही दोष नसतानाही ते बदलले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

‘जनजागृतीऐवजी थेट अंमलबजावणी’

स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या हिताचे असल्याचा दावा महावितरणकडून केला जात असेल, तर त्याचे फायदे, कार्यपद्धती आणि ग्राहकांना होणारे लाभ याबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक होते, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. मात्र, याबाबत कोणतीही प्रभावी माहिती मोहीम राबविण्यात आलेली नसून थेट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोशल मीडियावर ग्राहक संघटित

स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांच्या तक्रारी एकत्रितपणे मांडण्यासाठी शिरूरमधील वीज ग्राहक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊ लागले आहेत. यासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप गट तयार करण्यात आला असून नागरिकांना त्यांच्या तक्रारी, अनुभव आणि प्रश्न नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि निवेदने संकलित करून महावितरण कार्यालयाकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर सनदशीर मार्गाने आंदोलन आणि पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

वीजपुरवठ्याच्या समस्यांवरही आवाज

स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांबरोबरच वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, त्यामुळे उद्योग-व्यवसाय व दैनंदिन कामकाजावर होणारा परिणाम, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होणारा त्रास या मुद्द्यांवरही ग्राहकांच्या वतीने आवाज उठविण्यात येणार आहे.

“ग्राहकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटर आणि खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारला जाईल,” असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि शंकांमुळे शिरूरमध्ये हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून महावितरणकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button