Uncategorized
हुडको कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नागरिकांची मागणी
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातील हुडको कॉलनी (छत्रपती संभाजीनगर) परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी अविनाश सुरेश घोगरे यांनी शिरूर नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगराध्यक्षा, मुख्याधिकारी तसेच नगरसेविका यांना दिलेल्या निवेदनात हुदको कॉलनीतील पाचही लाईन परिसरात अलीकडच्या काळात विविध प्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः दुचाकी वाहनांमधून रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरी होण्याचे प्रकार वारंवार घडत असून काही वाहनचोरीच्या घटनांबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

परिसरात महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व नोकरदार कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणात असून प्रभावी निगराणी यंत्रणेचा अभाव असल्याने चोरी करणाऱ्यांवर आळा बसत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली वाढल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

हुडको कॉलनीतील प्रमुख रस्ते, अंतर्गत मार्ग, प्रवेश व निर्गमन बिंदू, चौक तसेच इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या कॅमेऱ्यांची नियमित देखरेख व नियंत्रण यंत्रणाही कार्यान्वित करण्यात यावी, असे निवेदनात नमूद आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास चोरी, वाहनचोरी, वाहनांमधील पेट्रोल चोरी तसेच इतर गुन्हेगारी प्रकारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल. यामुळे पोलिसांना तपासकामात मदत होण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
