पसायदान’ हा मानवी व वैश्विक हक्कांचा जाहीरनामा : डॉ. सुधाकर आव्हाड

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे विश्वगीत असून, त्यातून संपूर्ण जगाला मानवी हक्कांचा संदेश देण्यात आला आहे. पसायदान हे मानवी व वैश्विक हक्कांचा जाहीरनामा असून, त्यातील विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, लेखक व ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांनी केले.
शिरूर येथील सनशाईन क्लबच्या वतीने डॉ. आव्हाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, माजी आमदार अशोक पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास फडतरे, माजी अध्यक्ष नोटरी शिरीष लोळगे, नोटरी वसंत उबाळे, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप बारवकर, नोटरी रवींद्र खांडरे आदी उपस्थित होते.
डॉ. आव्हाड म्हणाले, “जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितले. पसायदानातील ‘खळांची व्यंकटी सांडो’ या ओळीत माणसातील वाईटपणा दूर व्हावा, अशी भूमिका मांडली आहे. माऊलींचा मानवाच्या चांगुलपणावर विश्वास होता. संत हे उत्तम मानसशास्त्रज्ञ होते.”
ज्ञानेश्वरी केवळ वाचण्याचा विषय नसून, ती आयुष्यभर जगण्याचा विचार आहे. महाभारत आणि भगवद्गीतेतून मिळणारे तत्त्वज्ञान आजच्या जगालाही लागू पडते. मानवी स्वभावातील द्वंद्व महाभारतात दिसते आणि तेच द्वंद्व आजही समाजात पाहायला मिळते. माणसाने माणसाशी चांगले वागण्याबरोबरच प्राणिमात्रांशीही चांगले वागले पाहिजे.
जीवन जगताना प्रत्येकाच्या आयुष्याला उद्देश असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास उलगडून सांगितला. राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेत १५ महिलांचा सहभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल किशोरराजे निंबाळकर यांचा माजी आमदार अशोक पवार व डॉ. सुधाकर आव्हाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले. परिचय व स्वागत प्रदीप बारवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिरीष लोळगे यांनी आभार मानले.
