शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी कुमार रामचंद्र कदम यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण पुणेविभागात बदली झाल्यानंतर कदम यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सन २००६ बॅचचे अधिकारी असलेले कुमार कदम यांनी आपल्या सेवाकाळात मुंबई,नागपूर शहर, पुणे शहर, चाकण, आळंदी, कुरुंदवाड, कागल, तसेच पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे काम केले आहे.आठ महिन्यांपूर्वी ते सासवड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले होते.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना कदम यांनी एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हे प्रमुख प्राधान्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. औद्योगिक क्षेत्रात वाहतूक सुरक्षितता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असून, नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्रातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे हेही सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.नागरिकांकडे यासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास ती पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. माहिती देणाऱ्यांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसी परिसरातील मजूर अड्ड्यांवर पोलीस गस्त वाढविण्यात येणार असून भाडेकरू ठेवणाऱ्या घरमालकांनी त्यांची संपूर्ण माहिती ठेवावी असे आवाहन कदम यांनी केले. तसेच लेबर कॉन्ट्रॅक्टरकडील कामगारांची माहिती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिकदृष्ट्या वेगाने विस्तारत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी परिसरात वाहतूक व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध, अमली पदार्थांविरोधातील कारवाई आणि औद्योगिक शांतता राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत कुमार कदम यांनी पदभार स्वीकारताच दिले आहेत.