
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
पालकांनी मुलांच्या शाळा व शिक्षणमाध्यमाची निवड करताना केवळ चकचकीत इमारती, सुविधा किंवा नावाजलेपणाकडे न पाहता त्या शाळेत दिले जाणारे शिक्षण मुलांना प्रत्यक्षात समजते का, तसेच त्यातून त्यांच्या कल्पनाशक्ती, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेला वाव मिळतो का, याचा विचार करावा,
असा सूर मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२६ मधील चर्चासत्रात व्यक्त झाला. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास मुलांची सर्जनशीलता अधिक बहरते; त्यामुळे शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावे, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
मराठी अभ्यास केंद्र, कृषी लोकविकास संशोधन संस्था आणि शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ‘शिक्षणाचे माध्यम आणि पालकांची भूमिका’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात लेखक-दिग्दर्शक विनोद लवेकर, मुक्ता लवेकर, कुल्फी त्रैमासिकाचे हृषीकेश दाभोळकर आणि भाषाभ्यासक गंगाधर तोडमल यांनी सहभाग घेतला.
यावेळी विनोद लवेकर म्हणाले, “शिक्षणातून मुलांमध्ये केवळ माहिती नव्हे, तर सर्जनशीलता आणि भावनांची जाणीव निर्माण होणे महत्त्वाचे आहे. आनंद-दुःख समजून घेण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. पालकांनी शिक्षणमाध्यमाची निवड सजगपणे करावी. इंग्रजीव्यतिरिक्त मराठी हाही सक्षम पर्याय आहे. शाळेच्या बाह्य स्वरूपापेक्षा अध्यापन पद्धती आणि मुलांना शिकवलेले समजते का, हे महत्त्वाचे आहे.”
हृषीकेश दाभोळकर यांनी सांगितले की, “जगातील अनेक देशांत
लोकांना इंग्रजीचे ज्ञान नसतानाही ते तंत्रज्ञानात प्रगत आहेत. ज्ञान कोणत्याही एका भाषेशी बांधलेले नाही. कोणत्याही भाषेतून ज्ञान मिळवता येते.ज्ञान मिळविण्याचे एकूण चार कप्पे असून त्यात पुस्तकी शिक्षण घेण्याचा भाग २५ टक्के, खेळ, कला, कौशल्यविकास यांचा भाग २५ टक्के, सुसंवादी जीवन जगण्याचा व्यवहार २५ टक्के आणि स्वअस्तित्व समजून घेण्याचा भाग २५ टक्के असतो.
यात पुस्तकी शिक्षण घेताना आपल्या परिसरातील भाषा, मातृभाषा याचा प्रथम विचार होणे आवश्यक आहे.
भाषा अभ्यासक गंगाधर तोडमल म्हणाले, “शाळेचे भव्य स्ट्रक्चर न पाहता त्या शाळेतील शिक्षकांचे शिक्षण, त्यांची गुणवत्ता आणि अध्यापन क्षमता पाहूनच प्रवेशाचा निर्णय घ्यावा.”
मुक्ता लवेकर यांनीही मातृभाषेतून दिलेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, अशी भूमिका मांडली.चांगली कारकिर्द घडण्यासाठी इंग्रजी भाषेत शिक्षण हवे ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्यानंतर मुले त्या विषयावर मनन, चिंतन करताना मातृभाषेचाच आधार घेतात. असे त्या म्हणाल्या.