राष्ट्रीयविशेष

मराठी शाळेला सक्षम करण्यासाठी साहित्यिक कलवंतासह समाजातील सर्वानी एकत्रित येऊन मराठीचे दूत म्हणून काम करावे : राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे

सजग व सुजाण पालकत्वासाठी आयोजित दोन दिवसीय मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे शिरूर येथे उद्घाटन

oplus_131074

शिरूर -{ डेली न्यूज पोस्ट टीम 24)मराठी शाळा व मराठीला सक्षम करण्यासाठी साहित्यिक कलवंतासह समाजातील सर्वानी एकत्रित येऊन मराठीचे दूत म्हणून काम करावे असे आवाहन राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त जालिंधरनगर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांनी शिरूर येथे केले.

मराठी अभ्यास केंद्र, कृषी लोकविकास संशोधन संस्था, शिरूर आणि शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सजग व सुजाण पालकत्वासाठी आयोजित दोन दिवसीय मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे उद्घाटन शिरूर येथील जीवन विकास मंदिर, कुकडी वसाहत येथे झाले. यंदा या महासंमेलनाचे नववे वर्ष असून समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे.

उद्घाटनप्रसंगी वारे गुरुजी म्हणाले की, इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत असताना पालकांनी सावध भूमिका घेणे आवश्यक आहे. कोणत्याही भावनेच्या आहारी जाऊन मुलांना इंग्रजी शाळांकडे वळविणे हा अभ्यासाअभावी घेतलेला चुकीचा निर्णय ठरू शकतो. शालेय प्रवेश काळात मराठी शाळांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत असताना पालकांनी जागरूक राहून आपल्या पाल्यांना मराठी शाळांकडे वळविणे हेच सजग पालकत्व आहे. यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आणि लोकचळवळ महत्त्वाची ठरणार आहे.

मराठी शाळा टिकविण्यासाठी लोकसहभाग अनिवार्य असून जागतिक दर्जाचे शिक्षण केवळ शहरी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच मिळते, ही धारणा चुकीची आहे. जात-पात-धर्म भेदाप्रमाणेच भविष्यात सरकारी मराठी शाळा आणि खासगी इंग्रजी शाळांतून शिकून अधिकारी झालेल्यांमध्ये भाषिक भेद निर्माण होण्याची शक्यता आहे

संमेलनाची भूमिका मांडताना मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी सांगितले की, मराठी शाळांविषयी समाजमनात सकारात्मक बदल घडवणे, पालकांमध्ये मराठी भाषेविषयी आपुलकी निर्माण करणे आणि मराठी माध्यमाच्या शाळांबाबतचे गैरसमज दूर करणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. इंग्रजी व मराठी माध्यम अशी नवी वर्णव्यवस्था निर्माण होऊ नये, मराठी पालकांचे एकत्रिकरण व्हावे आणि ‘महाराष्ट्र धर्म’ टिकावा, हीच या संमेलनामागील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठी शाळा व मराठी शिक्षक पिढ्या घडवितात, असे नमूद करत अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी संमेलनास शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना सांगितले की, वेगावर भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीत मुलांच्या मनाचा विचार होत नाही. प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण न घेतल्यास मुलांवर मानसिक ताण येऊ शकतो. मातृभाषेचा पाया मजबूत असेल तर मूल बहुभाषिक होऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृषी लोकविकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात ज्ञाननिर्मितीची गरज असून खासगीकरण न होता ते समाजाच्या मालकीचे राहावे यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. शिक्षकांबद्दल आत्मीयता आणि आदरभाव निर्माण करणारी संस्कृती पुन्हा उभी करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार निकम,जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, मुख्याध्यापक महासंघाचे नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, ॲड. सुभाष पवार, राहुल पाचर्णे, नगरसेविका स्वप्नाली जामदार, डॉ. सुनिता पोटे, स्वाती साठे, सागर नरवडे, आनंद भुजबळ आदी उपस्थित होते.

सकाळी मराठी शाळा जागर फेरी काढण्यात आली. यामध्ये शिरूर व परिसरातील विविध मराठी शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या आवारातील प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद भंडारे यांनी केले, तर आभार नगरसेविका डॉ. सुनिता पोटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button