राष्ट्रीयविशेष

मराठी शाळा संपुष्टात आल्या, तर मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात : चित्रपट दिग्दर्शक लेखक हेमंत ढोमे

oplus_131106
oplus_131074
oplus_131074

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट टीम 24}मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी मराठी पालकांची आहे. मराठी शाळा संपुष्टात आल्या, तर मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात येईल. अभ्यासू वृत्ती, चिकाटी आणि व्यावहारिक हुशारीच्या जोरावर मातृभाषेत शिक्षण घेणारा विद्यार्थीही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकतो, असे प्रतिपादन अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केले.

मराठी अभ्यास केंद्र, कृषिलोक विकास संशोधन संस्था, शिरूर आणि शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचा समारोप रविवारी झाला. जीवन विकास मंदिर, कुकडी वसाहत येथे झालेल्या समारोप समारंभात ढोमे बोलत होते. यावेळी ‘क्रांतिज्योती विद्यालय (मराठी माध्यम)’ या चित्रपटाच्या निर्मात्या क्षिती जोग, अभिनेत्री व मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक, आनंद भंडारे उपस्थित होते.

ढोमे म्हणाले, शिक्षण क्षेत्र बाजारू झाले असून शिक्षकही पगारी मानसिकतेत अडकले आहेत. त्यामुळे मराठी भाषेसाठी अशा संमेलनांची गरज भासत आहे, ही खेदाची बाब आहे. मराठी शाळेतील प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेशी नाते जपून ‘फुला ना फुलाची पाकळी’ जरी दिली, तरी मराठी शाळा बंद पडणार नाहीत. शहरातील पालक काही प्रमाणात सजग झाले असले, तरी ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय (मराठी माध्यम)’ हा चित्रपट पाहून पालकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडत असतील आणि मराठी शाळांना चांगले दिवस येत असतील, तर त्यालाच चित्रपटाचे खरे यश म्हणता येईल. आपण स्वतः जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षण घेऊन विदेशात एम.एस्सी. पूर्ण केल्याचेही त्यांनी नमूद केले.

क्षिती जोग म्हणाल्या, आज इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या अनेक मराठी मुलांना इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा नीट बोलता येत नाहीत, ही गंभीर स्थिती आहे. इंग्रजी शिकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत; मात्र मराठी भाषा शिकविणे व जपणे हे केवळ मराठी शाळांमधूनच शक्य आहे. या चित्रपटानंतर इंग्रजी माध्यमातील काही मराठी मुले मराठी भाषेत उत्तरे देऊ लागली आहेत, हे छोटे पण आशादायक बदल आहेत.

नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी मराठी भाषेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विना-अनुदानित खासगी मराठी शाळा टिकविण्यासाठी ‘मराठी शाळा कृतज्ञता निधी’ उभारण्याचा मानस डॉ. दीपक पवार यांनी यावेळी जाहीर केला. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्यांविषयी रवींद्र धनक यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

      हेमंत ढोमे शिरूरकर

  1. दरम्यान हेमंत ढोमे यांनी क्षिति जोग यांचा परिचय करून देत असताना सांगितले की क्षिति जोग या क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटाच्या त्या निर्मात्या असून माझ्या पत्नी व शिरूरच्या सून असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ढोमे यांचे आजोळ शिरूर असून आपला जन्म ही शिरूर येथे झाला असल्याचे त्यांनी सांगितले.  मामाच्या घरी बालपणी नेहमी येत होतो असे ते म्हणाले.ढोमे यांचे मूळ गाव पिंपरखेड, ता. शिरूर हे आहे  दरम्यान या संमेलन प्रसंगी क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटात असणारे गीत नृत्यद्वारे जीवन विकास मंदिर शिरूरच्या मुलांनी सादर केले. या सादरीकरणास टाळ्या वाजून हेमंत ढोमे व पत्नी क्षिती जोग यांनी दाद दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button