शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 }शिरूर शहर परिसरातील प्रसिद्ध उद्योजक सुवालाल पोखरणा यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, शिरूर येथे त्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष विकास पोखरणा, संचालिका पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नगरसेवक अमित कर्डिले, नगरसेविका रिंकू जगताप, मुख्याध्यापिका पसक्कीन काशी, मुख्याध्यापक संतोष येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुवालाल पोखरणा यांचे ७५ दिव्यांनी औक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे तसेच गीतांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात बोलताना विकास पोखरणा म्हणाले, “सुवालालजी यांच्या प्रेरणेतूनच व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा पाया घालण्यात आला. अत्यंत प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय सुरू करून त्याचे उद्योगात रूपांतर केले. व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपत गावाशी नाळ कायम ठेवली.”
परिसरातील मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हे सुवालाल पोखरणा यांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठीच व्हिजन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करण्यात आली. व्यवसायाचा व्याप सांभाळतानाही त्यांनी व्यायामाची शिस्त जीवनात जपली. कठीण प्रसंगातही प्रामाणिकपणा आणि सचोटी न सोडल्यामुळेच त्यांना उज्वल यश मिळाल्याचे ते म्हणाले.
या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक अमित कर्डिले व नगरसेविका रिंकू जगताप यांचाही सत्कार करण्यात आला. दोन्ही नगरसेवकांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सुवालाल पोखरणा यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पसक्कीन काशी यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक संतोष येवले यांनी तर सूत्रसंचालन शिवाली वाखारे यांनी केले. आभार प्रदर्शन शीतल जाधव यांनी मानले.