विशेष

कुटुंबाचा आधारवड, कार्याच्या दीपस्तंभ

ॲड .सुभाष यशवंतराव गायकवाड (आण्णा) यांचा ७५ वा अभिष्टचिंतन सोहळा

शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}जीवनाच्या वाटेवर चालताना नात्यांना जपणारे,अनुभवातून मार्ग दाखवणारा शब्द आणि शांतपणे कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे ॲड . सुभाष यशवंतराव गायकवाड सर्वांचे लाडके आण्णा. वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत असताना त्यांच्या आयुष्याच्या या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.

हा स्नेहपूर्ण आणि भावस्पर्शी सोहळा गायकवाड फार्म, वाखार वाडी रोड, हिंगणी दुमाला, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. आयुष्यभर कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाज यांना एकत्र ठेवत प्रेम, कर्तव्य आणि संस्कारांची शिदोरी वाटणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आण्णांनी आपल्या साधेपणाने, संयमाने आणि माणुसकीच्या नात्यांनी आदराचे स्थान मिळवले. कठीण प्रसंगी धीर देणारे शब्द असोत वा आनंदाच्या क्षणी पाठीवरची कौतुकाची थाप—त्यांचे अस्तित्व अनेकांसाठी आधाराचे सावलीवृक्ष ठरले आहे. त्यांच्या आयुष्याचा हा मैलाचा दगड म्हणजे केवळ वयाची संख्या नसून, अनुभवांनी समृद्ध झालेल्या संस्कारांची आणि मूल्यांची उज्ज्वल साक्ष आहे.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास आप्तेष्ट मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन समस्त गायकवाड परिवार आप्तेष्ट व मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲड . गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून वकील क्षेत्रात कार्यरत आहेत. वकील म्हणून काम करत असताना अनेकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. एक अभ्यासू व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. शिरूर वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याचबरोबर शिरूर नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या वकिली व्यवसायाचा वारसा त्यांचे चिरंजीव, सून त्याचबरोबर पुतणे पुढे चालवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button