राष्ट्रीयविशेष

सजग-सुजाण पालकत्वासाठी मराठीप्रेमी पालक महासंमेलन

१०-११ जानेवारीला शिरूरमध्ये चर्चासत्रे, परिसंवादांतून सखोल विचारमंथन

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}मातृभाषेतून शिक्षण, शालेय शिक्षणातील भाषाधोरण, पालकांची भूमिका आणि मराठी शाळांचे भवितव्य या विषयांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र, कृषी लोकविकास संशोधन संस्था (शिरूर) आणि शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सजग-सुजाण पालकत्वासाठी मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ दि. १० व ११ जानेवारी २०२६ रोजी शिरूर येथे आयोजित करण्यात आले आहे. जीवन विकास मंदिर, कुकडी वसाहत येथे हे दोन दिवसीय महासंमेलन होणार असल्याची माहिती संयोजक व कृषी लोकविकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी दिली आहे .

मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व, इंग्रजी भाषा शिकणे व इंग्रजीतून शिक्षण घेणे यातील फरक, इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे होणारे दुष्परिणाम, प्रयोगशील शाळांतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आदानप्रदान आणि मराठी माध्यमातील शिक्षणासाठी पालकांचे संघटन—हे महासंमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मराठी अभ्यास केंद्राचे समन्वयक आनंद भंडारे यांनी सांगितले.

शनिवार, दि. १० रोजी सकाळी ८ वाजता ‘मराठी शाळा जागर फेरी’ काढण्यात येणार आहे. जीवन विकास मंदिर (प्राथमिक-माध्यमिक), नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १, ४, ५, ६, ७, विद्याधाम प्रशाला, कला-विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (कुरुंद), प्राथमिक-माध्यमिक आश्रमशाळा (कुरुंद), अध्यापक महाविद्यालय (कुरुंद), शिवाजी विद्यालय (गोलेगाव), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गोलेगाव) आणि न्यू इंग्लिश स्कूल (शिरूर) यांचा या फेरीत सहभाग असणार आहे.

महासंमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेचे दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. दीपक पवार, अभिनेत्री व मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, मुख्याधिकारी प्रितम पाटील, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, विविध मुख्याध्यापक संघांचे पदाधिकारी व गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थानी रवींद्र धनक असतील.

दुपारी २ ते ३.३० या वेळेत विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. सायंकाळी ४ वाजता ‘मराठी शाळांमधील यशवंतांशी संवाद’ या सत्रात लेखक विनोद गायकर, दिग्दर्शक रविराज वाव्हाळे, अभिनेत्री प्रतीक्षा बारवकर, सहायक प्राध्यापक डॉ. हर्षद शिर्के, उद्योजक आकाश चकोर यांच्यासह विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्ती सहभागी होतील. सायंकाळी ५.३० वाजता ‘मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार?’ या विषयावर परिसंवाद होईल.

रविवार, दि. ११ रोजी सकाळी १० वाजता ‘शालेय शिक्षणात त्रिभाषा धोरणाची गरज आहे का?’ या विषयावर चर्चासत्र होणार असून डॉ. आनंद काटीकर, किशोर दरक व प्रकाश निर्मळ सहभागी होतील; अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश परब असतील. त्यानंतर ११.३० वाजता ‘शिक्षणाचे माध्यम आणि पालकांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद, दुपारी २ वाजता प्रयोगशील शाळांच्या उपक्रमांचे सादरीकरण, आणि सायंकाळी ४ वाजता ‘मराठी शाळा संस्थाचालकांपुढील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

दोन दिवसीय महासंमेलनाचा समारोप सायंकाळी ५.३० वाजता होणार असून यावेळी ‘क्रांतीज्योती विद्यालय (मराठी माध्यम)’ या चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. मनशक्ती केंद्र (लोणावळा), ग्राममंगल (पुणे), सिद्धसमाधी योग केंद्र (शिरूर), हॅपी थॉट्स (पुणे), आयटीसी (शिरूर) आणि महाराष्ट्र बालशिक्षण परिषद (पुणे) यांच्या सहकार्याने हे महासंमेलन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button