Uncategorizedराष्ट्रीय
भय इथले बिबट्याचे संपत नाही, बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ्य महिला मृत्युमुखी
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ५ ठिकाणी पिंजरे
शिरूर दिनांक -( डेली न्यूज पोस्ट टीम ) पूर्वभागातील इनामगाव ,ता. शिरुर मधील नलगेमळा येथे घराच्या बाहेरील ओट्यावर झोपलेल्या ९० वर्षीय ज्येष्ठ्य महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ओढत उसाच्या शेतात नेले यात लक्ष्मीबाई बबन भोईटे वय -९० या ज्येष्ठ्य महिलेचा मृत्यू झाला आहे.
नलगे मळा इनामगाव येथील लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ९० रा. नलगेमळा इनामगाव ता शिरूर) या घराच्या ओट्यावर झोपल्या होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने या महिलेवर हल्ला करून महिलेला उसाच्या शेतात ओढत नेले .यावेळेस लक्ष्मीबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या मुलाने खिडकीतून डोकावून पाहिले असता बिबट्या त्यांच्या आईला घेऊन उसाच्या शेतात गेला होता . स्थानिक ग्रामस्थांचा मदतीने महिलेचा शोध घेतला असता महिलेचे धड उसाच्या शेतात सापडले . शीर सापडले नव्हते पण नंतर व्यापक शोध घेतला असता शीर ही सापडले.
मागील काही दिवसापासून नलगेमळा येथे बिबट्याचा वावर वाढला आहे .
दरम्यान वनविभागाचा वतीने या भागात आज बिबट्या जेरबंद करण्यासाठी ५ पिंजरे लावण्यात आले . सहाय्यक वनसरंक्षक स्मिता राजहंस व तालुका वनपरिक्षेत्र आधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केल्याचे वनखात्याचे भानूदास शिंदे यांनी सांगितले .
भय इथले संपत नाही ,तरी इथे जिणे आहे, अशी अवस्था शिरूर तालुक्यातील बिबट्याचा वावराने व त्याच्या हल्ल्याने त्रस्त झालेल्या शिरूर च्या पूर्व भाग व बेट भागातील नागरिकांची झाली आहे.
मागील वर्षी पूर्व भागातील तीन लहानग्यांना बिबट्याचा हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. १९ ऑक्टोबर २०२४ रोजी वंश सिंग, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी टेभेकर वस्ती वरील शिवतेज टेंभेकर व २४ डिंसेबर २०२४ रोजी रक्षा निकम या चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले आहेत.
तर कुत्रा, शेळ्या, मेंढ्या, यांच्यावर ही सातत्याने हल्ले होत आहे. हल्ले झाले की प्रशासन जागे होते. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावणे, गस्त या सारखे उपाय काही दिवस केले जातात. हल्ल्याच्या चर्चेची तीव्रता कमी झाले की मागचे पाढे पुढे अशी गत होते. बिबट्या चा हल्ल्याने भयभीत झाल्यामुळे याभागातील शेतीसह दैनदिन कामावर ही परिणाम होत आहे.